सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांचे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात संत महंतांनी उत्साही वातावरणात स्वागत केले. शाही स्नानासाठी त्यांना रथावर आरूढ करून नेण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवराय’चा जयघोषही उपस्थितांमधून होत होता. लाखोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीच्या मनात छत्रपतींच्या घराण्याविषयीचा आदरभाव यावेळी दिसून आला.
आपल्या अजोड पराक्रमाने रयतेचे राज्य निर्माण करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती जगभर आहे. छत्रपतींचे वारसदार सातार्यात राहतात. या घराण्याविषयीचा आदरभाव अजूनही तितकाच टिकून आहे. छत्रपती घराण्यातील स्नुषा श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांना प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये आयोजित शाही स्नानासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी दमयंतीराजे पोहोचताच जमलेल्या लाखो संख्येच्या जनसमुदायाने छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती उदयनमहाराजांचा विजय असो, असा जयजयकार केला. दमयंतीराजेंना पाहण्यासाठी अबाल वृद्ध माता-भगिनींची गर्दी झाली होती. प्रत्येक जण त्यांना आदराने नमस्कार करत होता.
महाकुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या दिवशी छत्रपती दमयंतीराजे भोसले यांना महंत यांच्यासोबत रथावर बसून शाही स्नानाच्या ठिकाणाकडे नेण्यात आले. त्यावेळेस शाही स्नानासाठी आलेल्या जनसमुदायाने श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा ठसा आजही भारतातील समाजमनावर असल्याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली. छत्रपतींच्या राजघराण्यातील वारसांना पाहण्यासाठी महाकुंभमेळ्यात झालेली गर्दी पाहता या घराण्याविषयीचा आदरभाव अजूनही तितकाच टिकून असल्याचे दिसून आले.