सातारा : बोरगाव (ता. जि. सातारा) येथील पार्टीदरम्यान झालेल्या वादातून तरुणास लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी आरोपी समाधान गंगाराम शहापूरकर (वय ३२, रा. वळसे, ता. जि. सातारा) यास न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी १५ दिवसांचा सक्त कारावास भोगावा लागणार आहे.
ही घटना ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बोरगाव हद्दीतील वळसे येथील ‘मनोरंजन’ परिसरातील प्लॉटिंगच्या मोकळ्या जागेत घडली होती. फिर्यादी व साक्षीदार तेथे पार्टीसाठी गेले होते. पार्टी संपल्यानंतर आरोपी तेथून निघून जात असताना फिर्यादीने आरोपीस भांडी घासायची आहेत व साफसफाई करायची आहे, असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने हातात लोखंडी गज घेऊन पुन्हा तेथे येत फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर तसेच डोक्यात मारून त्यास जखमी केले. यावेळी साक्षीदारांनी आरोपीस पकडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी तेथून निघून गेला.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासी अधिकारी आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक सातारा शहर विभागाचे अधिकारी आणि प्राथमिक तपासी अंमलदार आर. डी. माने यांनी तपास केला. पोलिस नाईक ब. नं. ६७६ यांच्या मार्फत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी सातारा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक चारमध्ये झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील महेश यु. शिंदे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद, पाच साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा आधार घेत आरोपीस दोषी ठरविले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी आज (दि. २४) आरोपीस भा.दं.वि. कलम ३२४ अन्वये सहा महिने सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त सक्त कारावास भोगावा लागणार आहे.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील आणि बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विश्वनाथ आंब्राळे व पोलिस कॉन्स्टेबल शिरीष गोरे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी पाठपुरावा केला. तसेच पोलिस हवालदार संतोष देशमुख व पोलिस कॉन्स्टेबल चेतन बगाडे यांनी तपासकामी मदत केली.
वादातून तरुणास मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिने सक्तमजुरी; बोरगाव येथील प्रकरण
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा