महाबळेश्वरातील हॉटेल, रिसॉर्ट आस्थापनांना रोजगार व कौशल्य योजनांची माहिती; सेवा संकल्प अभियानांतर्गत आस्थापनांना प्रत्यक्ष भेटी; हॉटेल असोसिएशनसोबत संयुक्त बैठक

by Team Satara Today | published on : 05 October 2026


सातारा : शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने महाबळेश्वर तालुक्यातील सर्व्हिस सेक्टरमधील विविध आस्थापनांना प्रत्यक्ष भेटी देऊन रोजगार व कौशल्य विकास योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
अभियानांतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स तसेच सेवा क्षेत्रातील विविध आस्थापनांच्या प्रमुखांची भेट घेऊन शासनाच्या रोजगार व कौशल्य विकासाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य पोर्टलबाबत मार्गदर्शन करून आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सर्व्हिस क्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत रोजगार मेळावे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तसेच अन्य कौशल्य व रोजगारविषयक योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जास्तीत जास्त आस्थापनांनी नोंदणी केल्यास त्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांना विविध संधी उपलब्ध होतील, याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. काही आस्थापनांचे नोंदणी फॉर्म प्रत्यक्ष जागेवरच भरून घेण्यात आले.
विभागाच्या योजनांची माहिती जाणून घेतल्यानंतर हॉटेल व सेवा क्षेत्रातील आस्थापना प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानामुळे सेवा क्षेत्रातील आस्थापनांना शासनाच्या रोजगार व कौशल्यविषयक योजनांचा लाभ घेण्यास तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या अभियानात हॉटेल असोसिएशनचे सचिव रमेश कौल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार तसेच लिपिक टंकलेखक का. रा. पालवे यांनी सहभाग घेतला. सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील इतर भागांतही अशाच प्रकारची जनजागृती व आस्थापना भेटी सुरू राहणार आहेत


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी वापरात किमान १० टक्के कपातीचे निर्देश, जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने नियोजन
पुढील बातमी
पुणे विभाग पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षक म्हणून ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची नियुक्ती

संबंधित बातम्या