शेतकर्‍यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध - भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण; भाडळे उपसा योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

by Team Satara Today | published on : 24 July 2026


सातारा : कोरेगाव तालुक्यातील अतिदुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाण्याचा दिलासा देण्यासाठी गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत भाडळे उपसा योजना तसेच रामोशीवाडी ते भाडळे आणि भाडळे ते नलवडेवाडी गुरुत्वीय थेट नलिका या अत्यंत महत्त्वाकांक्षी कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यामुळे कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील सिंचन इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय सुरू झाला आहे.

या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी शेडगे, माजी उपसभापती लवकुमार मदने, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, रणधीर जाधव, जि. डी. खुस्पे, पोपटराव भराडे, बाळासाहेब जाधव, शंकर कदम यांच्यासह परिसरातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या योजनेच्या वेगाने सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले.

रवींद्र चव्हाण म्हणाले, जिहे-कठापूर योजना ही केवळ पाण्याची योजना नसून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाच्या भवितव्याला आकार देणारा भक्कम पाया आहे. स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या नावाने सुरू असलेल्या या योजनेचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुती सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे. रामोशीवाडी ते भाडळे या गुरुत्वीय थेट नलिकेच्या कामामुळे सिंचन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून येईल.

ते पुढे म्हणाले, स्थानिक आमदार महेश शिंदे यांनी या योजनेसाठी दाखवलेला पाठपुरावा आणि तडफ कौतुकास्पद आहे. राज्य शासनाने सिंचन प्रकल्पांना कोणताही निधी कमी पडू दिलेला नाही. ही योजना पूर्ण झाल्यावर परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या सावटातून पूर्णपणे बाहेर पडेल आणि आधुनिक शेतीच्या माध्यमातून इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल. शेवटच्या शेतकर्‍याच्या शेताला पाणी मिळेपर्यंत आमचे सरकार शांत बसणार नाही.

आमदार महेश शिंदे यांनी या प्रकल्पाचा संपूर्ण प्रवास आणि त्यामागची भूमिका मांडली. आमदार महेश शिंदे म्हणाले, जिहे-कठापूर योजना ही या भागातील शेतकर्‍यांची अस्मिता आणि जगण्याची संजीवनी आहे. केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळवून या योजनेला सुमारे 2200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आज रामोशीवाडी ते भाडळे थेट गुरुत्वीय नलिका योजनेचे भूमिपूजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होताना मला अत्यंत आनंद होत आहे.

ते पुढे म्हणाले, या गुरुत्वीय थेट नलिकेच्या तंत्रज्ञानामुळे पाण्याचा एकही थेंब बाष्पीभवन अथवा गळतीद्वारे वाया जाणार नाही. पाण्याचा थेट दाब मिळून टेल-एंडच्या शेतकर्यांपर्यंत पाणी पोहोचेल. पिंपोडे खुर्द, देऊर, बिचुकले, नलवडेवाडी, भाडळे, खामकरवाडी यांसारख्या अनेक वंचित गावांना यामुळे कायमस्वरूपी बारमाही पाणी मिळणार आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के सिंचनाखाली आणण्याचा जो शब्द मी जनतेला दिला होता, तो पूर्ण करण्याच्या दिशेने हे सर्वात मोठे पाऊल आहे.

मनोगतात डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, दीर्घकाळापासून हा परिसर पाण्यासाठी दुष्काळाच्या झळा सोसत होता. परंतु, जलसिंचनाची भक्कम सोय झाल्याने आता कोरडवाहू जमिनी ओलिताखाली येतील. शेती समृद्ध झाली की आपोआपच ग्रामीण भागातील रोजगार वाढेल आणि तरुण शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. हा प्रकल्प या परिसराचे भाग्य बदलणारा ठरेल.

कार्यक्रमादरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या थेट नलिका कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने भाडळे, रामोशीवाडी आणि लगतच्या गावांमधील शेतकरी बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

या थेट नलिकेमुळे भाडळे तलावात पाणी साठवून ते पुढे विविध उप-तलावांमध्ये सोडले जाणार असून, परिसरातील विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या सोहळ्याच्या सांगतेनंतर उपस्थितांचे आभार मानण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरणात 24 तासांत 3.02 टीएमसी पाण्याची वाढ; सध्या 70.88 टीएमसी पाणीसाठा, पावसाचा जोर कमी झाला
पुढील बातमी
रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत एकाचा मृत्यू; काशीळ ग्रामीण रुग्णालयासमोर अपघात

संबंधित बातम्या