सातारा :वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्त्वाचे भरणपोषण होण्यास आणि सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. अलीकडच्या काळात वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेल्या तरुण वर्गाला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून 1 ते 15 जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या उपक्रमात सहभागी होऊन विविध कार्यक्रम राबवित आहेत. आपण सर्वांनीही ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमात सहभागी होऊन वाचनाची सवय अंगिकारुया !
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दरवर्षी सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन या पंधरवड्यात करण्यात यावे. पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा 16 जानेवारी रोजी प्रत्येक महाविद्यालयात घेण्यात यावी. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तक निवडून संपूर्ण पुस्तकाचे सखोल वाचन करावे. आणि आपल्या आकलनाप्रमाणे वाचलेल्या पुस्तकावर चिंतनात्मक व समीक्षणात्मक परिक्षण निबंध लिहून तो संयोजकाकडे सुपूर्द करावा किंवा ठरलेल्या दिनांकास त्या निबंधाचे कथन करावे. प्रस्तुत परिक्षण निबंध किमान 500 शब्दांचा असावा किंवा त्याचे 5 मिनिटे कथन करावे, वाचनासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही भाषेचे आणि कुठल्याही विषयाचे (साहित्यापासून ते तंत्रज्ञानापर्यंत) पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य असेल. निवडलेले पुस्तक हे प्रवेशित विद्यार्थ्यांचे क्रमिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्त असावे.
पुस्तकाची निवड करण्यासंदर्भात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य, मार्गदर्शन करावे. वाचनीय पुस्तकांची यादी सूचना फलकावर दर्शनी भागात लावावी. महाविद्यालयाने, सार्वजनिक ग्रंथालयाने विद्याथ्यांची मागणी व पुस्तकांच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत. या स्पर्धेचे आयोजन करुन परिक्षकांकडून 3 उत्कृष्ट परिक्षण निबंधाची, कथनाची निवड करण्यात यावी आणि त्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र, बक्षीस महाविद्यालयाकडून देण्यात यावीत. स्पर्धेतील विजेत्या परिक्षण निबंधाचा समावेश महाविद्यालयाच्या वार्षिक अंकामध्ये करावा.
सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी निरंतर वाचनाची सवय जोपासावी. चला तर मग ज्ञान, कल्पकता आणि आत्मविश्वासासाठी नियमितपणे वाचन करण्याचा व वाचनातून समाजासाठी उपयुक्त ज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्प करुन ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊया!