मलकापूर : एका बाजूला महामार्गाचे काम, दुसरीकडे पावसामुळे खड्ड्याचे साम्राज्य त्यातच आज, शुक्रवारी महामार्गावरच वाहने बंद पडल्यामुळे मलकापुरात दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांसह, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू असून येथील युनिक उड्डाणपुलाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आलेली आहे. गेली तीन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे महामार्गाच्या दोन्ही लेनवर खड्ड्याचे सम्राज्य झाल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच मंडईजवळ बस बंद पडल्याने दिवसभर वाहतूक कोंडी झाली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस व कराड शहर पोलीस कर्मचारी प्रयत्न करत होते. एसटी महामंडळाकडून बस दुरुस्त करण्यासाठी किंवा ती रस्त्यावरून बाजूला घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात दिरंगाई केली जात होती. कोल्हापूर नाका, शास्त्रीनगर, शिवछावा चौक, मलकापूर फाटा ते नंदलापूर परिसरात दोन्ही लेनवर होणारी नेहमीचीच वाहतूक कोंडी स्थानिक नागरिकांची डोकेदुखी बनत आहे.
वाहनधारकांनी पुण्यावरून येताना मसूर मार्गे कराड मलकापूर वरुण पुढे हायवेवर यावे. आणि कोल्हापूर वरून येताना मलकापूर मार्गे कराड मसूर असा प्रवास करावा. पाऊस असे पर्यंत या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन कराड शहर व मलकापूर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मलकापूर परिसरात एसटी महामंडळाच्या बस बंद पडण्याचा सिलसिला कायमच सुरू आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी सकाळी मलकापूरात कोल्हापूर-सातारा लेनवर बस अचानक महामार्गावरच बंद घडली आणि वाहतूक कोंडी झाली.