सातारा : सातारा तालुक्यातील वाढे आणि वर्ये येथील वेण्णा नदीच्या पुलाजवळ उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करत स्वच्छतेचा संदेश दिला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद आणि गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दंडात्मक कारवाई केली.
ही कारवाई जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशिल संसारे, जिल्हा तज्ञ श्रीम. सन्मुख, तालुका समन्वयक अमित गायकवाड, हेमा बडदे, प्रियंका देशमुख, श्री.लोहार, श्रीम.भगत, श्रीम.धाराशिवकार व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
वेण्णा नदी परिसरात काही नागरिकांकडून वारंवार कचरा टाकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, प्रशासनाच्या पथकाने वाढे आणि वर्ये येथे प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन कारवाई केली. नियमभंग करणाऱ्यांना दंड आकारण्यात आला. तसेच पुढील काळात असे प्रकार पुन्हा घडल्यास अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.
जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी सांगितले की, “नदीकाठ व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे हा पर्यावरणाला आणि जनआरोग्याला घातक आहे. नागरिकांनी जबाबदार भूमिका घेतली पाहिजे. स्वच्छता राखणे ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”