सातारा : महाराष्ट्रामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र या नंबर प्लेट चे दर महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत. वाहतूकदारांना ही नंबर प्लेट बसवताना मिळणारी सेवा सुविधा आणि त्याचे डीलर यासंदर्भात अद्याप असंदिग्धता आहे. हे दर महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहेत. ते तात्काळ कमी करावेत, अशी मागणी सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी व सचिव धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांची भेट घेतली. या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये केंद्र शासनाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासंदर्भात 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. मात्र महाराष्ट्रात याबाबत प्रक्रिया करण्याचे शुल्क सगळ्यात जास्त आहे. ते तात्काळ कमी करावे ,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नियोजन समिती वाहतूक सुरक्षा समिती यामध्ये वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींना सदस्यत्व मिळावे, महाराष्ट्रात ई-चलनाचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत मालक ऑपरेटिंग सिस्टीम पद्धत निर्धारित करणे, महाराष्ट्र राज्य महासंघ ही प्रवासी व मालवाहतूक संघटनेची एकमुखी संघटना आहे. त्या संदर्भात राज्य शासनाने दर महिन्याला एक बैठक करावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.