कराडकरांसाठी अस्सल गावरान मेजवानीसह मनोरंजनाची पर्वणी ; 21 फेब्रुवारीपासून बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन मानिनी जत्रा - मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची माहिती

by Team Satara Today | published on : 20 February 2026


सातारा : उमेद महिला बचत गटांच्या मिनी सरस मानिनी जत्रेत बचत गट  उत्पादित वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या ७५ स्टॉल व खाद्यपदार्थांचे २५ स्टॉल सहभागी होणार आहेत. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून कराडसह परिसरातील नागरिकांसाठी  शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शेती उत्पन्न बाजार समिती बैल बाजार मैदानावर खरेदी, अस्सल गावरान चवीची खाद्य मेजवानी बरोबरच मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत बचत गटांनी मालाचे भव्य विक्री आणि प्रदर्शन मिनी सरस मानिनी जत्रा शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती बैल बाजार मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पत्रकारांशी  संवाद साधत होत्या. यावेळी प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे उपस्थित होते. 

मिनी सरस मानिनी जत्रेबाबत माहिती देताना याशनी नागराजन म्हणाल्या, उमेद बचत गटा अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. बचत गट उत्पादित माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून महिलांना उत्पादन विक्रीची संधी मिळावी यासाठी उमेद अभियान जिल्हा कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. याचाच भाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य कक्षाच्या सूचनेनुसार  २१ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दरम्यान कराड येथे शेती उत्पन्न बाजार समिती, बैल बाजार मैदानावर सकाळी १० ते रात्री १० या वेळेत मिनी सरस-मानिनी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी एक वाजता कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती बैल बाजार मैदानावर राज्याचे ग्रामविकास  व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन समारंभास पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री ना.श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, खासदार नितीन पाटील, खासदार श्री छ.उदयनराजे भोसले, खासदार  धैर्यशील मोहिते पाटील आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत तासगावकर, आमदार अरुण लाड, आमदार महेश शिंदे, आमदार डॉ अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ७५ बचत गट उत्पादनाचे आणि २५ गावरान खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येत आहेत. यामध्ये महाबळेश्वरची जामजेली स्ट्रॉबेरी मध, पाटणची लाकडी खेळणी, जावलीचा हातसडी तांदूळ, मानचे जैन घोंगडी, वाईची हळद मसाले टेडी, कराडचा नैसर्गिक गुळ पौष्टिक कुळीथ सूप, फलटणचे खणाचे ड्रेस, कोरेगावचे पंचगव्य प्रोडक्स खंडाळाचे कडधान्य लाकडी तेल घाणा तेल आणि खटावची मातीची भांडी हा बचत गट उत्पादित माल या विक्रीस उपलब्ध असणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थांचे स्टॉलमध्ये गावरान मटन-चिकन, कोंबडी वडे, दम बिर्याणी, दालच्या घोष, भरलं वांग पिठलं भाकरी, दही धपाटे ठेचा आदी खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शनास भेट देणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी खास मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बालगोपाळांसाठी आकाश पाळण्यासह विविध प्रकारची खेळणीही या जत्रेत सहभागी असतील. 


सदर प्रसंगी मिनी सरस- मानिनी जत्रा  प्रदर्शनाला कराडवासीय नागरिकांनी तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भेट देऊन उत्साह वाढवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे आऊट गेट पुढे काढा - ना. शिवेंद्रसिंहराजे; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
पुढील बातमी
मेढ्यात फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश; फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक, २१ पर्यंत पोलीस कोठडी

संबंधित बातम्या