उद्योजकांना खंडणी खंडणी मागून अशांतता निर्माण केल्यास कठोर कारवाई करणार

औद्योगिक क्षेत्र जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे निर्देश

by Team Satara Today | published on : 10 April 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पावले उचलली आहेत. उद्योजकांना खंडणी मागून अशांतता निर्माण केल्यास संबंधित प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी सातारा आशिष बारकुल, वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, फलटण उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, माणच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, कोरेगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा कामगार अधिकारी नितीन कवले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉक्टर अमितकुमार सोंडगे इत्यादी उपस्थित होते

सातारा एमआयडीसी सह जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. एमआयडीसीमध्ये महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन औद्योगिक क्षेत्रामध्ये विशेष पथक गस्तीसाठी उपलब्ध ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. एमआयडीसी परिसरात खंडणी मागणी दहशत पसरवणे जबरदस्तीने माथाडी चे काम मागणे असे गैरकृत्य करणार आहेस इसमांच्या विरोधात एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात गोपनीय तक्रार बॉक्स ठेवण्यात येणार आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. तात्काळ प्रतिसादाकरता डायल 112 नंबर चा उपयोग करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून तत्सम यंत्रणेला त्या अंमलबजावणीच्या सूचना निर्गमित झाल्या आहेत. सातारा एमआयडीसी मधील उद्योजकांना वेगवेगळ्या कारणावरून खंडणी मागण्याचे उद्योग होतात अशा तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर वेगवेगळ्या कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या. एमआयडीसी मधील तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये कोणी जर खंडणी मागत असेल याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे झाल्यास त्या प्रकरणाची विशेष यंत्रणेमार्फत चौकशी करून त्यावर कारवाई केली जाईल.

आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीत सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. सदस्य व कामगार आयुक्तांनी या संदर्भात आपले विचार व्यक्त केले. आर्थिक गुन्ह्यांवर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उपलब्ध कायद्याचा जास्तीत जास्त कठोरपणे वापर करून गुन्हे सिद्धी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या. बैठकीमध्ये शिरवळ व खंडाळा येथील दोन कंपन्यांच्या तक्रारी झाल्या होत्या त्यांची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. एमआयडीसी बाबतच्या तक्रारी संदर्भात दर महिन्याला या समितीची नियमित बैठक घेण्यात येईल असे धोरण ठरवण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यात खंडणी विरुद्ध लढा अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा समीर शेख यांनी व्यक्त केली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात होणार तब्बल 3950 कोटीची गुंतवणूक

संबंधित बातम्या