खटाव : खटाव तालुक्यातील शेतकर्यांच्या ऊस दराचा निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत गोपूज येथे उद्या, दि. 12 रोजी बैठक आयोजित केल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी दिली.
घार्गे म्हणाले, खटाव तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. शेतकर्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी आम्ही दरवर्षी संघर्ष करत आलो आहोत. खटाव तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने, दराविषयी शेतकर्यांमध्ये एकमत व्हावे आणि त्यांना आपला फायदा-नुकसान कळावे, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दि. 16 ऑक्टोबरला जयसिंगपूर येते होणार्या 24 व्या ऊस परिषदेतील दर मागणीची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे. या हंगामातील खटाव तालुक्यात ऊस दराची मागणी आणि विविध कारखान्यांच्या ऊस बिलांच्या थकबाकीबाबतही चर्चा होणार आहे.
या बैठकीस जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकर्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव यांनी केले आहे.