सातारा : मौजे गोंदवले बुद्रूक गावातील जेष्ठ नागरीक पंचक्रोशीतील प्रगतीशील शेतकरी, आनंदराव बाबाजी भोसले यांचे वयाच्या 96 व्या वर्षी अल्प आजाराने काल दु:खद निधन झाले. गोंदवले गावातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या निस्वार्थी कार्याचा वेगळा ठसा उमटवला होता.
वयाच्या शहाण्णवाव्या वर्षी देखील अगदी अलीकडे पर्यंत ते कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात कार्यरत होते. गोंदवले आणि परिसरातील ग्रामीण क्षेत्रातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आपली एक एकर जमिन दान दिली होती. एक दानशुर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज वारकरी मंडळ, गोंदवल्याचे ते अध्यक्ष होते. गोंदवले बुद्रूक येथील नवचैतन्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या स्कूल कमिटीचे ते सदस्य होते.
एक अजातशत्रु व्यक्तीमत्व म्हणून समाजामध्ये त्यांना वेगळे स्थान होते. त्यांच्या पश्चात मुले-सुना, मुलगी-जावई, नातवंडे-पतवंडे असा मोठा परिवार आहे. जलमंदिर पॅलेस, सातारा येथील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे दप्तर प्रमुख सुभाष भोसले यांचे ते वडील होते.
त्यांच्या दु:खद निधनामुळे समाजातील सर्व स्तरामध्ये हळहळ व्यक्त होत असून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दुरध्वनीवरुन अथवा समक्ष भेटून भोसले कुटुंबियांचे सांत्वन केले