सांगा आम्ही काय गुन्हा केला? आम्हाला अजूनही संविधानाच्या बाहेर का ठेवलेले आहे?: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ लेखक-प्रकाशकांचा साहित्य संमेलनात सत्कार

by Team Satara Today | published on : 03 January 2026


स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : सांगा आम्ही काय गुन्हा केला? अजूनही आमच्याकडे चोर, दरोडेखोर म्हणूनच का पाहिले जाते, आम्हाला अजूनही संविधानाच्या बाहेर का ठेवलेले आहे? स्वतंत्र भारतात अजूनही आम्हाला गुलाम का बनवू पाहिले जाते अशी आर्त वेदना ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी आज व्यक्त केली. 

निमित्त होते, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या ज्येष्ठ लेखक-प्रकाशक सत्कार सोहळ्याचे. या सोहळ्यात लक्ष्मण गायकवाड आणि ज्येष्ठ प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर यांचा आज (दि. ३) विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनिताराजे पवार, अमेरिकेचे खासदार व साहित्यिक श्रीनिवास ठाणेदार आदी मान्यवर उपस्थित होते. 

गायकवाड म्हणाले, भटके विमुक्त हे शिवरायांचे खरे मावळे आहेत. मी लेखक म्हणून त्यांच्या वेदनांना शब्द देण्याचे काम करतो. महाराष्ट्रात आम्हाला अजूनही स्वातंत्र्य नाही याची मात्र खंत वाटते. स्वतंत्र महाराष्ट्रात आमच्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद केलेली नाही. आज भटक्या विमुक्तांची लोकसंख्या ४ कोटी आहे व त्यात ४७ जाती आहेत. असे असताना आम्हाला संविधानाच्या बाहेर का ठेवले आहे. आमच्या सवलती का नाकारल्या आहेत हा आमचा खरा प्रश्न आहे. या प्रकरणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष घालावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, सातारा ही ऐतिहासिक नगरी आहे तसे साहित्यक्षेत्रातही या शहराचे योगदान मोठे आहे. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासंदर्भात जी अपेक्षा लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली त्या बाबतीत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले नक्की मार्ग काढू शकतात. कवीवर्य बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक जतन करण्यासंदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर नक्की पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

बाबुराव मैंदर्गीकर यांनी आपल्या प्रकाशनव्यवसायाच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, १९९० साली सुरू झालेल्या आमच्या सुविद्या प्रकाशनाने आजवर ५०० पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. आपण सर्वांनी आपल्या मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. 

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले अशा साहित्यिक-प्रकाशकांचा आपण सन्मान केला आहे. लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या विद्रोहाचे रुपांतर विद्वेषात होऊ दिले नाही. वेदना, विद्रोह आणि नकार ही सूत्रे त्यांनी जतन करून सकस लेखन केले. तर प्रकाशक मैंदर्गीकर यांनी सातत्याने प्रकाशनविश्वात प्रामाणिकपणे काम केले आहे. 

विश्वास पाटील म्हणाले, मराठीला प्रकाशकांची मोठी परंपरा लाभलेली आहे. ‘उचल्या’मधून गायकवाड यांनी मांडलेली वेदना अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे अशा दोन व्यक्तींचा सत्कार होणे महत्वाचे आहे. 

या निमित्ताने साहित्य संमेलनात योगदान दिलेले महामंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त आणि देशव्यापी संस्थांचे प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी तसेच उज्ज्वला मेहेंदळे, प्रतिभा सराफ, दादा गोरे, रामचंद्र काळोखे, देवीदास फुलारी, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नाळे, विद्या देवधर (तेलंगणा), मोहन रेडगावकर (मध्यप्रदेश), कूपर वासनिक (छत्तीसगड), रमेश म्हसकर (गोवा), संजय बच्छाव (बडोदा) यांच्यासह विश्वस्त समितीचे ॲड. प्रमोद आडकर, प्रकाश पागे, तीर्थराज तापगते, बाळासाहेब देशमुख, सतीश तराळ, हेमलता पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले. 

श्रीनिवास ठाणेदारांनी जिंकली सातारकरांची मने 

खास अमेरिकेहून आलेले श्रीनिवास ठाणेदार यांचे अस्खलित मराठीतील मनोगत सातारकरांना विशेष भावले आणि सर्वांनीच त्यांच्या संवादाला दाद दिली. माझे शिक्षण मराठी शाळेत झाले. गरीब घरातून पुढे येत मी अमेरिकेत स्वतःची कारकीर्द घडवली. तिथे पीएचडी केली. आमदार झालो आणि आता खासदारही झालो. लोकशाहीच्या जपणुकीसाठी तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात महाभियोग दाखल करण्याचे धाडसही मी दाखवले. मी जी राजकीय क्षेत्रात वाटचाल केली तीच मी पुस्तकरुपाने शब्दबद्ध केली आहे. साताऱ्यात येऊन खूप आनंद झाल्याने त्यांनी सांगितले. सातारकरांनीही त्यांच्या भाषणाला टाळ्यांची मनापासून दाद दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमेरिकेच्या खासदारांनाही साहित्य संमेलनाची भुरळ; मराठीशी आपले घट्ट नाते जपलेले हे खासदार म्हणजे श्रीनिवास ठाणेदार
पुढील बातमी
कथांमधून उलगडले समाजवास्तवतेचे दर्शन; उस्फूर्त प्रतिसादाने कथाकथनाचा सोहळा खऱ्या अर्थाने रंगला

संबंधित बातम्या