सातारा जिल्हा परिषदेत 'टशन'; भाजप की देसाई-पाटील गट? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? जिल्ह्याचे लक्ष

by Team Satara Today | published on : 02 March 2026


​सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या गणिताला वेग आला आहे. ६५ जागांच्या या मिनी मंत्रालयात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने 'त्रिशंकू' अवस्था निर्माण झाली असून, फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा आता 'सोयीच्या' समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. २७ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेचा 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी अपक्ष आणि छोट्या गटांच्या हाती सत्तेच्या चाव्या असणार आहेत.

​​भाजपने सर्वाधिक जागा मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी "पुढील जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच असेल" असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने आपल्या गटनेतेपदी राजूभैया भोसले तर उपगटनेतेपदी मदन काळभोर यांची निवड करून मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची ताकद भाजपच्या पाठीशी असल्याने, अपक्ष उमेदवारांना आपल्या गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

​​राज्यात महायुती सत्तेत असली तरी साताऱ्यात मात्र चित्र वेगळे दिसत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी एकत्र येत भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येऊन आपला अध्यक्ष बसवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी या दोन्ही नेत्यांनी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

​​सत्तेचे गणित: ३३ चा आकडा कोण गाठणार?

​एकूण ६५ जागांच्या सभागृहात बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता आहे. भाजपला अजून ६ जागांची गरज आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांची संख्या भाजपच्या जवळ जाते. अशा परिस्थितीत अपक्ष आणि लहान गटांची भूमिका किंगमेकर ठरणार आहे.

​सातारा जिल्हा परिषदेच्या या 'कुरघोडी'च्या राजकारणात शेवटी बाजी कोण मारणार आणि जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजिंक्यताऱ्यावरून २०० फूट खोल दरीत कोसळून अनोळखीचा मृत्यू; 'शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स'च्या टीमकडून जिवाची बाजी लावत रेस्क्यू ऑपरेशन
पुढील बातमी
'स्वतःच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं सरकार शेतकऱ्यांना काय तारणार?'; आमदार शशिकांत शिंदेंचा सरकारवर घणाघात

संबंधित बातम्या