रांगोळीवाले भोळेभाबडे व्यक्तिमत्व चारुदत्त यांचे निधन; सातारकरांकडून श्रद्धांजली

by Team Satara Today | published on : 18 December 2025


सातारा : शहरातील एक अत्यंत आगळेवेगळे आणि आपल्या भोळ्याभाबड्या स्वभावासाठी परिचित असणारे व्यक्तिमत्व, श्री. चारुदत्त (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सातारकरांनी एका निस्सीम आनंदी आणि सदैव हसमुख चेहऱ्याला गमावले आहे.

श्री. चारुदत्त हे साताऱ्यातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे किंवा विविध कार्यालयांच्या बाहेर अत्यंत आवडीने आणि हौसेने रांगोळी काढण्यासाठी ओळखले जात असत. कोणत्याही कार्यक्रमात स्वतःहून पुढाकार घेऊन रांगोळी काढणे हा त्यांचा जणू नित्यक्रमच होता. आपल्या कलेचा आनंद इतरांना देण्यातच त्यांनी धन्यता मानली. रांगोळी काढल्यानंतर बक्षीस म्हणून ते हक्काने पैशांची मागणी करत असत. मात्र, कोणी पैसे दिले तर त्यांना होणारा आनंद जितका निखळ असे, तितकाच कोणी पैसे दिले नाहीत तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधी मावळत नसे. 'दिले तर आनंद, नाही दिले तरी सदैव हसतमुख' हा त्यांचा बाणा अनेकांना थक्क करत असे.

समाजात अनेक व्यक्ती येतात आणि जातात, परंतु आपल्या साधेपणाने, कलेने आणि निस्वार्थ वृत्तीने लोकांच्या स्मरणात राहणारी माणसे विरळच असतात. श्री. चारुदत्त हे त्यापैकीच एक होते. साताऱ्याच्या रस्त्यांवर आणि कार्यक्रमांमध्ये दिसणारा हा उत्साही चेहरा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सातारकरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील आरफळ येथे रस्त्याच्या बाजूला अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
पुढील बातमी
पीक कर्ज वितरण, स्वयंरोजगारांना अर्थसहाय्यासाठी सकारात्मक काम करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे बँकांना निर्देश

संबंधित बातम्या