सातारा : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याच्या कृत्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी तीव्र निषेध करीत असल्याचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे.
श्री. देशमुख यांनी यासंदर्भात प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे ,की सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना दिल्लीतील ॲड.राकेश किशोर यांनी गवई यांच्या दिशेने बूट फेकत ' सनातन का अपमान नही सहिंगे ,' अशी घोषणा दिली. श्री राकेश किशोर यांचे हे कृत्य निषेधार्ह आहे . हे कृत्य म्हणजे न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे. पेशाने वकील असताना आणि न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेचा अभ्यास असतानाही त्यांनी स्वतःला सनातनी म्हणवत केलेले कृत्य केवळ निषेध व्यक्त करून बाजूला करता येणार नाही. अशा घटनांत कृती करून जनमानसात काय प्रतिक्रिया उमटते, याचा अंदाज घेत आपला कार्यक्रम हळूहळू पुढे न्यायच्या डावपेचाचा हा भाग आहे. संत तुकारामांनी बहुदा अशा नरांनाच पैजाराने मारण्याचा उपदेश आपल्याला केला असावा, असे वाटते.
दरम्यान, अशा हल्ल्याने भारतीय न्यायव्यवस्था ,संविधान कदापिही कमकुवत होणार नाही. सनातनी प्रवृत्तींचा मनुवादी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न आचंद्रसूर्य फलद्रूप होणार नाही, असेही श्री देशमुख यांनी या पत्रकात म्हटले आहे.