सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग अद्याप अधिकृतपणे फुंकले गेले नसले, तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपने जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर महायुतीतील शिवसेनेने मात्र घाईघाईने भूमिका जाहीर न करता पहिले मतदार यादी, मग राजकीय डाव’ अशी सावध पण आक्रमक रणनीती स्वीकारली आहे. ठराव संकलन आणि मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
कर्हाड येथे पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सध्या ठराव संकलन सुरू असून त्यानंतर कच्ची आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद किती आहे, कोणत्या गटाकडे किती ठराव आहेत आणि अंतिम मतदार यादीचे चित्र काय आहे, याचा सविस्तर आढावा घेतल्यानंतरच शिवसेना पुढील निर्णय घेणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.
त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही केवळ ‘थांबा आणि पाहा’ अशी नसून निवडणुकीच्या गणिताचा बारकाईने अभ्यास करून योग्य वेळी राजकीय पत्ता उघडण्याची रणनीती असल्याचे मानले जात आहे. भाजपने स्वबळाची भाषा सुरू केली असली तरी शिवसेनेने अद्याप कोणत्याही आघाडीची किंवा उमेदवारीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी पडद्यामागील जुळवाजुळव सुरू असल्याचे राजकीय चित्र आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील पारंपरिक गट, स्थानिक राजकीय वजन, ठरावधारकांची संख्या आणि मतदारसंघनिहाय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे फक्त पक्षीय घोषणांवर नव्हे, तर प्रत्यक्ष मतदारांच्या आकडेवारीवर शिवसेना आपली रणनीती निश्चित करणार, असे देसाई यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण’ चिन्ह गोठविण्याची मागणी केल्याच्या वक्तव्यावर देसाई यांनी जोरदार हल्लाबोल केला. धनुष्यबाण’ गोठविण्याची मागणी म्हणजे केवळ पक्षाचे चिन्ह गोठविण्याची मागणी नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठविण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राऊत यांच्या वक्तव्याचा शिवसैनिक तीव्र निषेध करीत असून, जिथे संजय राऊत दिसतील तिथे शिवसैनिक त्यांना या विधानाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही देसाई यांनी दिला.
एकीकडे भाजपची स्वबळाची तयारी, दुसरीकडे शिवसेनेची मतदार यादीवर नजर आणि तिसरीकडे सहकारातील स्थानिक गटांची स्वतंत्र राजकीय गणिते यामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीतील अंतर्गत ताकदीचीही कसोटी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना कोणत्या मतदारसंघात ताकद लावणार, कोणत्या गटांशी हातमिळवणी करणार आणि भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेला कितपत प्रतिसाद देणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.