सातारा : सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने सातारा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून गेल्या तीन दिवसांपासून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या तरी नगरपालिका कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. गळती दुरुस्त करून कास पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रवींद्र ढोणे, राजू गोरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या.
नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसातही नगरपालिका कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काम करणे आव्हानात्मक असले तरी नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
काम पूर्ण होताच कास योजनेतून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.