भुईंज : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले हे केवळ जिल्ह्याचे नेते नव्हते, तर प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन म्हणजे जनहितासाठी अखंड समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे, असे मत भुईंजचे सरपंच विजय वेळे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांची 91 वी जयंती भुईंजमध्ये विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यावेळी विजय वेळे बोलत होते. विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष मदन शिंदे, आबासाहेब वीर पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दौलतराव भोसले, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, सदस्य रमेश दगडे, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय वेळे म्हणाले, प्रतापरावभाऊंनी आपल्या आयुष्यात अशक्य वाटणारे अनेक निर्णय घेतले. धोम धरण, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आदी कामांबरोबर ग्रामविकास मंत्री असताना अनेक लोकोपयोगी कामे केली. दौलतराव भोसले म्हणाले, भाऊंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती. देश, समाज आणि मानवतेच्या सेवेसाठी सतत कार्य करणे, हीच त्यांची साधना होती. त्यांनी जीवनातील विविध पैलूंना सखोलतेने स्पर्श केला. त्यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. भाऊंनी जिल्ह्याच्या विकासाची केलेली पायाभरणी अवर्णनीय आहे. रवींद्र भोसले म्हणाले, उल्हासदादा पवार यांनी ‘ आठवणीतले भाऊ’ या पुस्तकात भाऊंच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही, तर एका व्यक्तीच्या मूल्यांची, जाणिवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याच्या वृत्तीची निर्मिती कशी होते, हे दाखवले आहे.