सातारा : साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांची सातारा जात पडताळणी अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्याबाबत मंगळवारी आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे हे सातारा जात पडताळणी समिती अध्यक्षपदाचा पदभार गुरुवार, दि. २७ रोजी स्वीकारणार आहेत.
अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे दाखल झालेले अपिलिय दावे वेगाने निकाली काढले. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून चोखपणे जबाबदारी पार पाडली. गौण खनिज कारवाया व शासकीय योजनांना गती देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रभारी जिल्हाधिकारी म्हणूनही यशस्वीपणे कामकाज केले. पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावत प्रशासनातील दुवा म्हणून त्यांनी काम केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांची अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) संवर्गात पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती झाली आहे. त्यामुळे त्यांचा आयएएसमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पदोन्नतीने राज्य शासनाने त्यांची सातारा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबत राज्य शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी राज्यपालांच्यावतीने आदेश काढले आहेत.