सातारा : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सातारा नगरपरिषदेत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ऍड. डी. जी. बनकर यांच्या हस्ते नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.
स्वातंत्र्य हे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षातून आणि बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा केवळ उत्सव न साजरा करता त्यामागील मूल्ये जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. देशाची एकता आणि अखंडता मजबूत करण्यासोबतच समाजातील सर्व घटकांनी परस्पर सहकार्याची भावना ठेवून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले.
सातारा शहराची ओळख ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून आहे. या वैभवशाली परंपरेला आधुनिक विकासाची जोड देताना शहरातील मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत. शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय भूमिका बजावणे गरजेचे असल्याचे ऍड. डी. जी. बनकर यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, विकासकामांचा दर्जा आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे या बाबींवर आगामी काळात भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याबरोबरच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढल्यास शहराच्या विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सातार्याच्या विकासाची पुढील दिशा ठरविताना नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षांना महत्त्व देण्यात येईल. शहराला अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देत विकासाच्या नव्या पर्वाकडे घेऊन जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी नमूद केले.
राजवाडा गोलबाग येथे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण
दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त राजवाडा गोलबाग येथे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याठिकाणीही नागरिकांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. दोन्ही ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, ज्येष्ठ नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेवक सुशांत महाजन, पंकज चव्हाण, रविराज किर्दत, विश्वतेज बालगुडे, सागर पावशे, दिलीप म्हेत्रे, सुनीलकुमार भंडारी, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, नगरसेविका हेमलता भोसले, सुजाता गिरिगोसावी, वैशाली राजेभोसले, अनिता फरांदे, अर्चना कांबळे, रीना भणगे, शांता कोळी, भारती शिंदे, जयश्री जाधव तसेच मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.