खंडाळा : शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात. आता शिक्षण विभागाने ‘शाळा भेटी’ हा नवा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शिरवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. दरम्यान, शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांची चक्क इंग्रजीतून मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना नागराजन यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या दिवशी श्रीमती नागराजन यांनी जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. यावेळी शिरवळ येथील मुलींच्या शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यामध्ये मुलींनी एकूण १० भाषेतून साधलेला संवाद, मोडीलिपीची ओळख, नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेतील यश व ग्रामपंचायतीने केलेला शाळेचा विकास पाहून शाळेचे व तालुका शिक्षण विभागाचे कौतुक केले.
यावेळी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच अमोल कबुले, ग्रामपंचायत सदस्य राहुल तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीचंद बोडरे उपस्थित होते. यावेळी सीईओ नागराजन यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाची पाहणी केली व मुलांची अंक ओळख व इतर मनोरंजनात्मक उपक्रमाची पाहणी केली, तर इयत्ता दुसरीमधील विद्यार्थिनींच्या प्रगतीची पाहणी पाहताना या विद्यार्थिनींनी श्रीमती नागराजन यांना इंग्रजीतून मुलाखत देण्याचा आग्रह केला.
अनेक प्रश्न विचारले, तेच प्रश्न मुलींना विचारल्यानंतर मुलींनी ही अस्खलितपणे उत्तरे दिली. तर जर्मनी, जपानी, फ्रेंचसह एकूण १० भाषेतील सवांद मुलींनी साधला, तसेच मोडीलिपीची अंक ओळखही मुलींनी करून दाखविली. या शाळेतील मुलींना व मुख्याध्यापक उदेश गायकवाड, वर्गशिक्षक नूरजँहा काझी यांचे श्रीमती नागराजन यांनी कौतुक केले.