सातारा : सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 98 जनावरांचा लंपी त्वचारोगाने मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली. लंपी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभाग अलर्ट झाला असून गावोगावी लसीकरणासह विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यात 17, कराड 174, खंडाळा 19, खटाव 169, कोरेगाव 253, माण 289, पाटण 56, फलटण 45, सातारा 687 अशा मिळून 1 हजार 709 जनावरे लंपी त्वचारोगाने बाधित आहेत. आतापर्यंत जावली तालुक्यात 6, कराड 122, खंडाळा 18, खटाव 151, कोरेगाव 235, माण 215, पाटण 42, फलटण 36, सातारा 609 अशा मिळून 1 हजार 434 जनावरावर पशुसंवर्धन विभागाने योग्य औषधोपचार केला गेल्याने ही जनावरे बरी झाली आहेत. आतापर्यंत 98 जनावराचा लंपी त्वचारोगाने मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त सातारा तालुक्यात 45 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 177 जनावरांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी दिली.
लंपी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसह राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. ज्या-ज्या ठिकाणी लंपी त्वचारोगामुळे जनावरे बाधित झाली आहेत. अशा जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. तसेच विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर जनावरांना लसीकरणही करण्यासाठी यंत्रणा अलर्ट आहे.