उत्तराखंडमध्ये अडकले महाबळेश्वरचे पर्यटक

by Team Satara Today | published on : 02 July 2025


महाबळेश्वर : उत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 150 ते 200 पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील संभाजी जाधव यांच्या कुटुंबातील सहाजणांचा समावेश आहे. या पर्यटकांच्या सुटकेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने उत्तराखंडमधील प्रशासनाशी संपर्क साधला आहे. दरम्यान, बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही सुरक्षित आहोत, असे यातील आपत्तीग्रस्त पर्यटक आकाश जाधव यांनी सांगितले. 

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेसाठी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, बीड, नाशिक तसेच कर्नाटकातील पर्यटक गेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये ढगफुटी होत आहे. त्यामुळे प्रमुख व अंतर्गत रस्ते अक्षरश: वाहून गेले असून कनेक्टिव्हिटी तुटली आहे. या पर्यटकांना आता सध्या असलेल्या जिल्ह्यातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड या गावातील कुटुंब अडकल्याची वार्ता येताच जिल्ह्यातील नागरीकांचा थरकाप उडाला.

झांजवड गावातील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव, आकाश जाधव, आशिष जाधव, नीलम जाधव, कल्पना जाधव व नियती जाधव असे कुटुंबातील एकूण सहाजण उत्तराखंडमधील सुरू असलेल्या ढगफुटीमध्ये अडकले आहेत. हे कुटुंब महाबळेश्वर येथून दि. 28 जून रोजी रेल्वे व खासगी वाहनाद्वारे रवाना झाले होते. सातार्‍यातून डेहराडून येथे गेले. तेथून गंगोत्रीला जायचे त्यांचे नियोजन होते. मात्र, अचानक ढगफुटीने हाहाकार उडवला. थरकाप उडवणारा पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामध्ये प्रचंड हानी झाली. रस्ते वाहून गेले. त्यामुळे या कुटुंबासह अनेक पर्यटक यमुनोत्री येथे अडकून पडले. त्या ठिकाणाहून तेथील स्थानिक प्रशासनाने त्यांना मदतीचा हात दिला.

त्यांना जानकी चट्टी ते राणा चट्टी यादरम्यान अडकलेल्या पर्यटकांना कारने घेऊन जाण्यात आले. तेथून त्यांना सुमारे सहा किलोमीटर चालत एका डोंगरापर्यंत जावे लागले. तेथून त्यांना स्थानिक प्रशासनाने बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी वाहनातून सुखरूप हलवण्यात आल्याची माहिती अडकलेले पर्यटक आकाश जाधव यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

आकाश जाधव व कुटुंबीय अडकल्याची माहिती सातारा जिल्हा प्रशासन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे प्रशासन व ना. शिंदे यांनी या पर्यटकांशी संपर्क साधला. स्वत: ना. एकनाथ शिंदे यांनी आकाश जाधव यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी जाधव यांनी आपण कुठे आहोत व तेथील काय परिस्थिती आहे, याची सर्व माहिती दिली. यावर ना. एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली जाईल. तसेच स्थानिक जिल्हाधिकार्‍यांमार्फत जिल्हावासियांची तेथून सुटका केली जाईल, अशी ग्वाही दिली.

दरम्यान, जे पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत यातील अनेक जण शासकीय नोकरदार असून त्यांच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्याचबरोबर रस्ते तुटल्याने दळणवळण बंद झाले आहे. परिणामी अनेक वस्तूंची टंचाई भासण्यास सुरूवात झाली आहे. याचबरोबर पावसामुळे दूरध्वनीद्वारे संपर्क होत नसल्याने व्हाटस्द्वारे संपर्क साधून या पर्यटकांनी सरकार व सातारा जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली आहे. या राज्यात रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पर्यटक अडकून पडले आहेत. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकल्यानंतर जाधव कुटुंबिय आणि नातेवाईकांकडून प्रशासनाकडे मदत मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनीही जाधव कुटुंबियांशी संपर्क साधला आहे.

उत्तराखंडमधील यमुनोत्री परिसरात आम्ही अडकलो होतो. आमच्या कुटुंबातील एकूण सहा सदस्य आहेत. आम्हाला स्थानिक प्रशासनाकडून रेस्क्यू करून आता बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी हलवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क झाला आहे. त्याचबरोबर सातार्‍यातील जिल्हा प्रशासनही आमच्या संपर्कात आहे. इकडे भीतीचे वातावरण आहे. सध्या आम्ही मदतीची वाट पाहात आहोत. आमची येथून लवकर सुटका करावी. 

- आकाश जाधव, झांजवड (अडकलेले पर्यटक)


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पुढील बातमी
नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव - पाटील

संबंधित बातम्या