सातारा : बालेकिल्ल्यातच भाजप उमेदवाराचा पराभव करून एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे राजेंद्रसिंह यादव हे कराडच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ही दोस्ती तुटायची नाही... असे म्हणत खा. उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री राजेंद्रसिंह यादव यांची गळाभेट घेत आपल्या आनंदाला वाट करून दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वीच कराड नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि शरदचंद्र पवार यांच्या गटांची युती झाली. भाजपने स्वतःच्या ताकदीवर या निवडणुकीला सामोर जाण्याचा निर्णय घेतला. कराड नगरपालिकेचे सत्ता आपल्याच हातात राहावी यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे यांनी प्रचंड प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कराड येथे एक जाहीर सभा घेऊन भाजपच्या उमेदवारांना विजय करून आ. अतुन भोसले यांना ताकद देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. प्रत्यक्षात मात्र या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांच्या उमेदवारांचा विजय झाला. नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव यांच्या नावावर कराडच्या जनतेने शिक्कामोर्तब केले. ही निवडणूक भाजपसाठी आत्मचिंतन करण्याची ठरली होती.
निकालाच्या धामधुमीनंतर उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री कराड येथे जाऊन आपले मित्र राजेंद्रसिंह यादव गळाभेट घेत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उदयनराजे भोसले यांना आपले आनंदाश्रू आवडता आले नाहीत. उदयनराजे भोसले आणि राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव यांची मैत्री संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. यापूर्वी राजेंद्रसिंह यादव यांनी कराड येथे आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना उदयनराजे भोसले यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. उदयनराजे यांनी राजेंद्रसिंह यादव यांची घेतलेली गळाभेट त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून ही गळा भेट राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
हटके स्टाईलचा पुन्हा एकदा साक्षात्कार
आपल्या हटके स्टाईलमुळे उदयनराजे भोसले संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. एका पत्रकार परिषदेत खुर्च्यावर खुर्च्या मांडून त्यावर बसून त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद, एका सभेमध्ये उडवलेली कॉलर, अचानक आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करणारे उदयनराजे सर्व परीचित आहेत. काही दिवसांपूर्वीच जलमंदिर येथे विद्यार्थी- विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने गप्पा मारणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा आता राजेंद्रसिंह यादव यांची गळाभेट घेऊन त्यांनी आपल्या स्टाईलचा पुन्हा एकदा साक्षात्कार दाखवून दिला आहे.