कोल्हापूर : बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेल्या चंदगड तालुक्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. धाकलू बाळू शिंदे (वय ६५, रा. हेरे, ता. चंदगड) आणि बाबू सखाराम डोईफोडे (वय ५७, रा. बांदराई धनगरवाडा, तिलारी नगर, ता. चंदगड) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. ही कारवाई गुरुवारी ( दि. १३) दुपारी तपोवन मैदान येथे करण्यात आली. पोलिसांनी संशयतांकडून बिबट्याचे कातडे, दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त केले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील दोघे बिबट्याचे कातडे विकण्यासाठी तपोवन मैदानात येणार असल्याची माहिती कॉन्स्टेबल योगेश गोसावी यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून धाकलू शिंदे आणि बाबू डोईफोडे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त केले. वनविभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जप्तीचा पंचनामा करून दोन्ही संशयीतांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितानी बिबट्याची शिकार कुठे केली, याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात वन्य प्राण्यांची शिकार आणि अवयवांची तस्करी होत असल्याचा प्रकार स्पष्ट झाला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह अंमलदार योगेश गोसावी, वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, अरविंद पाटील तसेच वनविभागातील अधिकारी राजेंद्र उलपे, प्रमोद पाटील, रणजीत पाटील यांनी ही कारवाई केली.