मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. हिमाचलच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीत चित्रित झालेली दृश्यं, आणि ट्रेकिंगचे साहसी क्षण यामुळे ‘‘मना’चे श्लोक’चे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. चित्रपटातील काही खास दृश्यं हिमाचल प्रदेशातील सुमारे साडेबारा हजार फूट उंचीवर चित्रीत करण्यात आली आहेत. हिमाचलच्या हिरव्या पर्वतरांगांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग करणं हे जितकं निसर्गरम्य दिसते, तितकेच ते आव्हानात्मकही होतं.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर आणि करण परब ट्रेकिंग करताना दिसत आहेत. ही दृश्य चित्रीत करताना संपूर्ण टीमने प्रत्यक्ष ट्रेक करत सगळी उपकरणं आणि आवश्यक साहित्य स्वतःच्या खांद्यावर वाहून नेलं. इतक्या उंचीवर कोणतीही वॅनिटी व्हॅन, मेकअप रूम किंवा इतर सोयी उपलब्ध नव्हत्या.
या अनुभवाविषयी दिग्दर्शिका आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणाली, ‘’हा प्रवास आमच्यासाठी खूपच अनोखा होता. इतक्या उंचीवर संपूर्ण टीमला घेऊन जाऊन चित्रीकरण करणं, हे खूपच मोठं आव्हान होतं. वॅनिटी वॅन, मेकअपसारख्या कोणत्याच गोष्टींचा आधार न घेता, सर्वांनी मिळून हा ट्रेक केला. सर्व कलाकारांनी आणि टीमने अपार मेहनत घेतली आहे. हा प्रवास प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब ही तरुण कलाकारांची मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबतच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाला मिळतोय विरोध?
सज्जन गड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या शीर्षकाचा विरोध केला आहे. ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर सिनेमासाठी केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर, मनोरंजनासाठी, काल्पनिक गोष्टींसाठी नको, अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटाचं नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही श्री समर्थ सेवा मंडळाने दिला आहे. परंतु, अद्याप या प्रकरणी सिनेमाची टीम किंवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.
‘‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केलं असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्याद्वारे हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.