स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : साताऱ्याचे दोन महाराज माझे फार आवडते आहेत. एक थोरले शाहू महाराज आणि दुसरे प्रतापसिंह महाराज. थोरले शाहू महाराज यांच्यावर संशोधनात्मक लेखन करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करेन, असे आश्वासन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात विश्वास पाटील बोलत होते. यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या थोरवी विषयी बोलताना समाजमाध्यमावर अपप्रचार करणाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली. ते पुढे म्हणाले, मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांची समाधी कर्नाटकात आहे. तिची अवस्था फार वाईट आणि बिकट आहे. त्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. कोट्यवधी रपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आपण बांधतो पण त्यांच्या पित्याच्या समाधीची दुरवस्था होणे ही लाजिरवाणी बाब आहे.
मराठीसाठी रस्त्यावरही लढाई लढू..
मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेविषयी बोलताना ते म्हणाले, मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणूस टिकावा, वाढवा आणि समृद्ध व्हावा यासाठी आपण वेगळा विचार करायला हवा. आपल्या वापरात ही भाषा आवर्जून राहील याचा कटाक्ष मराठी माणसाने पाळला पाहिजे. आपण साहित्यिक आणि सहिष्णू पद्धतीने ही लढाई लढत आहोत. पण गरज पडली तर माय मराठीसाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरून लढू शकतो, हे दाखवून दिले आहे. माय मराठीच्या अस्तित्वासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई पण लढायला तयार आहोत.
अपूर्ण माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी समाज माध्यमांवर मुक्ताफळे उधळणाऱ्या ट्रोलर्सची कान उघाडणी करताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी लिहिताना, बोलताना मी प्रचंड अभ्यास केलेला असतो. पण हल्ली लोक त्यावर व्यक्त होताना कोणतीही माहिती न घेता उगाच बडबडत असतात. त्यामुळे वातावरण बिघडत आहे; असहिष्णुता पसरत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अनेक साहित्यकृतीतून विष पसरवले गेले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवाजी सावंत यांची ‘छावा’ आणि माझी ‘संभाजी’ ही कादंबरी महत्वाची ठरली. आमच्या या योगदानाची कोणी दाखल घेणार आहे की नाही? असा खडा सवालही त्यांनी केला.