हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो., शरीरात वाढलेल्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे शरीर पूर्णपणे थकून जाते. जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मानसिक तणाव, धूम्रपान इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरातील अर्जाची पातळी कमी झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय वयाच्या पन्नाशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांमुळे हाडं दुखणे, शरीरावर सुरकुत्या येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला कायम निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या सवयी फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शारीरिक हालचाली करणे :
वयाच्या ६० नंतर बरीच लोक कायम घरातच बसून राहतात. शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण होतो. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी घटक तसेच आतड्यांमध्ये साचून राहतात. त्यामुळे नियमित व्यायाम, चालणे, सायकलिंग, ध्यान, प्राणायाम करणे आवश्यक आहे. नियमित चालल्यामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. याशिवाय शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे दिवसभरातून नियमित ३० मिनिटं चालणे आवश्यक आहे. कार्डिओ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते.
सकाळच्या वेळी पौष्टिक नाश्ता :
सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते, यासोबतच शरीरात थकवा अशक्तपणा जाणवत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याची सुरुवात हलक्या पदार्थांचे सेवन करून करावी. हलके आणि पौष्टिक पदार्थ खाल्यास दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. तसेच आहारात प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता करावा.