बॅंकांनी जिल्ह्यात पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील

वार्षिक पत आराखड्याचे लोकार्पण

by Team Satara Today | published on : 20 August 2025


सातारा :  जिल्ह्यात सन 2025-2026 साठी पीककर्ज वितरणाचे  3800 कोटींचे उद्दिष्ट असून जुलै अखेर 2 लाख 49 हजार 186 खातेधारकांना खरिपासाठी 1812 कोटी रुपयांचे  पीक कर्ज वितरीत करण्यात आले. पीक कर्ज वितरणाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.


जिल्हा अग्रणी बँक आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


यावेळी सातारा जिल्ह्याचा 2025-2026 या आर्थिक वर्षाचा 19900 कोटी रुपयांचा वार्षिक पत आरखड्याचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विजय कोरडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक सौरभ सिंग, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे अंकुश मोटे, नाबार्डचे प्रबंधक   दिपाली काटकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक महाव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी बँकिंग क्षेत्राने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, उद्योग वाढ, रोजगार निर्मिती, विहित मुदतीत पीक कर्जाचे वितरण उद्दिष्ट पूर्ण करणे यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्य करावे. विविध महामंडळाकडील उद्योग व्यवसायासाठीच्या प्रकरणांमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पाटील यांनी केल्या.


जिल्हासाठी करण्यात आलेल्या वार्षिक पत आराखड्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी 6 हजार 300 कोटी व बिगर कृषी क्षेत्रासाठी 3 हजार 300 कोटी, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 4 हजार 300 कोटी असे एकूण प्राथमिकता क्षेत्रा करीता 13 हजार 900 कोटी व गैर प्राथमिकता क्षेत्रासाठी 6 हजार  कोटी उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर पीक कर्जासाठी 3 हजार 800 कोटीची तरतूद कृषी क्षेत्रामध्ये केलेली आहे.


जिल्हाधिकारी पाटील यांनी सर्व बँकांचा दिनांक ३१ जुलै पर्यंतचा पीक कर्ज वाटपाचा आढावा घेऊन प्रामुख्याने ज्या बँकांचे पीक कर्ज वाटप कमी आहे त्या बँकांना पीक कर्ज वाटपाच्या सक्त सूचना केल्या. तसेच अनेक बँका अतिशय कमी प्रमाणात कर्ज वाटप करत आहेत याबद्दल सुधारणा करणे गरजेचे असल्याचे असल्याचेही जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.


उद्दिष्ट पुर्ती केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कोटक महिंद्रा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.


अग्रणी बँक व्यवस्थापक तळपे यांनी सभेचे विषयांवर सादरीकरण केले.नितीराज साबळे यांनी सर्वांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर
पुढील बातमी
कराड शहराच्या सुशोभिकरणासाठी बंद असलेली कारंजी तात्काळ कार्यान्वित करावीत

संबंधित बातम्या