खटाव : जांब (ता. खटाव ) येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) यांचे रविवारी सकाळी (ता.२५ ) शेरी नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ यांच्या शेरी नावाच्या शिवारात विहीरचे बांधकाम सुरू आहे. गेली चार दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने काम ठप्प होते. रविवारी सकाळी शेतात फिरून येतो असे सांगून सोमनाथ घराबाहेर पडले ते संध्याकाळ झाली तरी घरी परतले नाहीत. दिवसभर पाऊस सुरू असल्याने व त्यांचा फोनही लागत नसल्याने काळजीपोटीसोमनाथ यांची आई उषा व पत्नी वनिता शिवारात शेजारच्या शेतकऱ्यांकडे फोनवरून चौकशी करू लागल्या.
शेतात विहिरीच्या बांधकामांचे काम सलग चार दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने अपूर्ण अवस्थेत राहिले होते. शेतात विहिरीवर जाऊन बघून येतो असे घरी सांगून शेतात गेलेले सोमनाथ आजूबाजूला पडलेले साहित्य गोळा करत होते. यावेळी त्यांचा विजेच्या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान येथील विकास सेवा सोसायटी चे सचिव व त्यांचे चुलत भाऊ रणजीत शिंदे यांना सोमनाथ विहिरीच्या बाजूला विजेचा धक्का लागून बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. रणजीत यांनी जोडीला गावातील शेतकरी घेऊन घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनेची रीतसर माहिती दिली. सोमनाथ यांचा तीव्र झटक्याने जाग्यावरच मृत्यू झाल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सोमनाथ लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे शिवारातच बैलाने मारल्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आई उषा यांनी दुःखातून सावरत व सोमनाथ यांना हाताशी धरून संसार पुन्हा जोमाने उभा केला होता. सोमनाथ यांनीही लहान वयातच घरची जबाबदारी यशस्वीपणे पेलली होती. सकाळ पासून शेतात ते आईबरोबर प्रचंड कष्ट करत होते. अलीकडच्या काळात त्यांनी शेतीत विविध प्रयोग करून कुटुंबाची बरीच प्रगती केली होती. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी ते अहोरात्र झटत होते.
हळूहळू सोमनाथ यांनी गावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात देखील हिरीरीने सहभाग घेऊ लागले.पत्नी वनिता यांना सरपंच पदी विराजमान करत स्वतःच्या नेतृत्व गुणांची त्यांनी चुणुक दाखवली होती . सोमनाथ यांच्या रूपाने कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अकाली निधन झाल्याने व कुटुंब उघड्यावर पडल्याने कुटुंबाबरोबरच गावावरही शोककळा पसरली आहे. या घटनेने खटाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी घटनेची रीतसर नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.