सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना रविवार पेठेतील काही जणांनी गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी शेतकरी किसान मंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांची शुक्रवारी सातार्यात बैठक झाली. या बैठकीत अशा अपप्रवृत्तींचा निषेध करण्यात आला व जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी किसान मंचचे राज्य अध्यक्ष शंकरअण्णा गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन शिंदे तसेच वेगवेगळे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकर्यांचा सातत्याने रस्त्यावरचा संघर्ष सुरू असतो. शेतकरी हा बळीराजा असून अन्नदाता आहे. त्याला जर अशा पद्धतीची दमदाटीची भाषा होणार असेल तर याची गंभीर दखल घ्यायला हवी. या दृष्टीने संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले.
सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणामध्ये सर्वांना ताब्यात घेतले आहे. तरीसुद्धा बाजार समिती असो अथवा मंडई या परिसरामध्ये शेतकर्यांचा सातत्याने वावर असतो. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करून शेतकर्यांची ज्या ठिकाणी वर्दळ आहे, तेथे पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.