सातारा : शिक्षणातून देशाची व्यवस्था कशी चालते हे समजून घेत नसू तर येणाऱ्या काळात प्रश्नच प्रश्न निर्माण होतील. जबाबदारी घेऊन नैतिक मार्गाने हित करणारे लोकप्रतिनिधी नसतील तर दर काळात तरुणांनी जागरूक राहून चांगली कामे होण्यासाठी सजग राहिले पाहिजे.आणि चुका होत असतील तर त्याचा विरोधही केला पाहिजे. नुसते तरुण असणे उपयोगी नसून आपले हक्क आणि कर्तव्ये काय ते समजून आचरण करणारी तरुणाई देशाला हवी आहे. संविधान समजून उमजून कार्य करणारी नीतिमान तरुणाईच देशाला योग्य दिशा देईल, असे विचार प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
जावली तालुक्यातील मालचौंडी येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी कॉलेजने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.नीलकंठ लोखंडे हे उपस्थित होते.
धर्म आणि संविधान यांची तुलना करताना ते म्हणाले की ‘ भारत हा धर्माधारित नसून धर्मनिरपेक्ष देश आहे आणि संविधान सर्व धर्मांना स्वातंत्र्य देते; मात्र सार्वजनिक जीवन व देशाच्या हिताला बाधा आणणारे कोणतेही वर्तन मान्य करत नाही. देशाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वागणे हे राष्ट्राच्या हिताविरुद्ध असून प्रश्न विचारविनिमयाने न सोडवता हिंसक मार्ग स्वीकारणे घातक आहे.संविधान सर्वांच्या हिताचा विचार करून एकता व बंधुता प्रवर्धित करण्याचे मार्गदर्शन करते; म्हणून प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा, पण संविधानिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
संविधान हा केवळ कायद्यांचा ग्रंथ नसून तो स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक करार आहे. तरुणांकडे ऊर्जा व बदल घडवण्याची क्षमता असून ती योग्य दिशेने वापरण्यासाठी संविधानाची जाणीव व कर्तव्यपालन आवश्यक आहे. संविधान जपायचे,जगायचे तरच लोकशाही टिकते. देशामध्ये कोणत्या समस्या आहेत,आणि त्या कशा सोडवता येतील याचे भान रोज ठेवले पाहिजे. देशाचे संरक्षण व कल्याण यासाठी सतत सावध असले पाहिजे. संविधान हा देशाचा जीवनमार्ग आहे.त्यात येणारे अडथळे दूर करून देश सुखी ठेवला पाहिजे. आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. लोकशाही टिकली तर देश सुरक्षित राहतो आणि संविधान समजलेली तरुणाईच भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.नीळकंठ लोखंडे यांनी संविधान निर्मिती कशी झाली हे सांगून त्यातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये या विषयीच्या कलमांची माहिती दिली. या व्याख्यान सत्राचे प्रास्ताविक अनुष्का मोहिते यांनी केले. तर आभार दिशा खामकर हिने मानले. प्रणाली खिलारे हिने सूत्रसंचालन केले. यावेळी सरपंच संपत रवले, संदीप कदम, कृष्ण महाराज, कदम शास्त्री, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,प्रकल्प अधिकारी प्रा. नवनाथ इप्पर, डॉ. विद्या नावडकर, डॉ. महादेव चिंदे व ग्रामस्थ व शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.