सातारा : सातार्यातील शिवतीर्थाचा विकास आराखडा सातारा पालिका सभेत मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चौथर्यासह उंची 40 फूट इतकी वाढवण्यात येणार आहे. नव्याने होत असलेल्या सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रशस्त दालनात छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रशासकीय सभेत हा निर्णय घेण्यात आला.
सातारा पालिकेची प्रशासकीय सभा शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता कमिटी हॉलमध्ये पार पडली. या सभेसमोर 500 विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी अमृता परदेशी, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, लेखापाल एकनाथ गवारी, नगररचनाकर हणमंत मोरे, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम, न्यायालयीन कक्ष प्रमुख हिमाली कुलकर्णी, एनयूएलएमच्या किर्ती साळुंखे, कर निरीक्षक उमेश महादार, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, विद्युत विभागप्रमुख अविनाश शिंदे उपस्थित होते.
सातार्यातील पोवई नाक्यावर असलेल्या शिवतीर्थाचा विकास करण्यात येत आहे. या शिवतीर्थाचा आराखडा प्रशासनाने सभेत मंजूर केला आहे. या आराखड्यानुसार शिवतीर्थाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. शिवतीर्थावरील चिरेबंदी बांधकाम झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची चौथर्यासह उंची सुमारे 40 फूटांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी आवश्यक चबुतराही मोठा करण्यात येणार आहे. पुतळ्याची उंची जास्तीत जास्त ठेवण्यासाठी ट्रायल कोअरची तपासणी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व चौथर्यासाठी सातारा पालिकेने 2.5 कोटींची तरतूद केली आहे. याचबरोबर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या इमारतीत प्रवेश केल्यावर समोरील प्रशस्त जागेत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचा भव्य पुतळा साकारण्यात येणार आहे.
शाहू कला मंदिरात वाळवी प्रतिबंधक काम करण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे बसवण्यात येणार आहेत. तसेच महामाता भिमाई आंबेडकर स्मारकावरही चर्चा करण्यात आली. शहरातील भटकी कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया, लसीकरण व उपचार केले जाणार आहेत. सातार्यातील हातगाडे, हॉटेलचालक व व्यवसायिकांकडून निर्माण होणार्या कचर्याचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास गैरसोय होवू नये यासाठी छोटे टँकर खरेदी करण्यात येणार आहे. खड्डे मुजवण्यासाठी पॅचवर्क मशिन घेण्यात येणार आहे. सातारा पालिकेचे कर्मचारी 35 वर्षांपासून पालिकेच्या चाळीत राहात असल्याने ती घरे त्यांच्या नावावर करण्यात येणार आहेत. माजगावकर माळ झोपडपट्टीवरील नागरिकांचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. विषयपत्रिकेचे वाचन सभा सचिव अतुल दिसले यांनी केले.