सातारा : घराशेजारीच असणार्या भाडेकरु कुटुंबातील युवतीने सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला असल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांनी युवतीला बोलते केल्यानंतर तिने चोरीची कबुली देत चोरीचा सोन्याचा ऐवज परत दिला.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 18 जुलै रोजी सोन्याचे दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना घरफोडी करणार्या आरोपींचा शोध घेवुन तात्काळ अटक करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभाग (डीबी) याचा तपास करत होते. पोलिसांनी घटनास्थळी जावून तक्रारदार यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी तक्रारदार यांच्या घरी दोन वर्षापासून एक कुटुंब भाडेतत्वावर राहण्यास होते. पोलिसांनी याबाबतची माहिती घेवून तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी संशयित कुटुंबातील व्यक्तींना आणून चौकशीला सुरुवात केल्यानंतर युवतीवर संशय अधिक बळावला. पोलीस विचारत असलेल्या प्रश्नांची ती योग्य उत्तरे देत नव्हती. पोलिसांनी तिला बोलते केल्यानंतर युवतीने दागिने चोरी केली असल्याची कबुली दिली. अशाप्रकारे पोलिसांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिणे व 7,000 रुपये असा एकूण 1,12,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी ढेरे, पोलीस सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, तनुजा शेख, कोमल पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.