रंगपंचमी खेळताना युवती बुडाली

टेंभूतील घटना; दोन युवकांना वाचविण्यात यश

by Team Satara Today | published on : 19 March 2025


सातारा : कराड तालुक्यातील टेंभू येथे कृष्णा नदीवर असलेल्या प्रकल्पानजीक बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मित्र-मैत्रीणींसोबत रंगपंचमी खेळताना दोन युवक व एक युवती प्रकल्पाच्या पाण्यात पडले. त्यापैकी दोन युवकांना वाचविण्यात यश आले असून युवती प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेली आहे. 

पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थ प्रकल्पाच्या पाण्यात बुडालेल्या युवतीचा शोध घेत आहेत. जुही घोरपडे (रा. कराड ) असे प्रकल्पात बुडालेल्या युवतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथील प्रकल्पानजीक बुधवारी दुपारी काही युवक व युवती रंगपंचमी खेळत होते. एकमेकांना रंग लावण्यासह पाणी उडविण्यात सर्वजण दंग असताना अचानक दोन युवक व जुही घोरपडे यांचा पाय घसरून ते प्रकल्पाच्या पाण्यात पडले. सोबत असलेल्या युवकांनी दोन युवकांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत जुही घोरपडे प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेली. 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने प्रकल्पाच्या पाण्यात जुही घोरपडे हिचा शोध सुरू केला आहे. सायंकाळपर्यंत ही शोधमोहिम सुरू होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्याधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांचा निषेध
पुढील बातमी
न्यायाधिशांनीच वाचवले पक्षकाराचे प्राण

संबंधित बातम्या