सातारा : भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत सातारा नगरपरिषदेला अत्याधुनिक हायड्रो जेटिंग मशीन प्राप्त झाले असून, शहरातील भूमिगत गटारे व सांडपाणी वाहिन्यांच्या यांत्रिक स्वच्छतेसाठी हे मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, देशातील शहरे कचरामुक्त करण्याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन सुधारणे, स्वच्छता व्यवस्थेचे यांत्रिकीकरण करणे, सफाई कर्मचान्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि शाश्वत नागरी स्वच्छता व्यवस्था निर्माण करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देत नागरी स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे.
सातारा नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या हायड्रो जेटिंग मशीनद्वारे उच्च दाबाच्या पाण्याच्या सहाय्याने भूमिगत गटारे, सांडपाणी वाहिन्या, मॅनहोल व चेंबर्समधील गाळ, कचरा व अडथळे प्रभावीपणे दूर करता येणार आहेत. त्यामुळे गटारे तुंबण्याचे प्रमाण कमी होऊन पावसाळ्यातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
या मशीनमुळे गटार सफाईसाठी सफाई कर्मचार्यांना प्रत्यक्ष गटारात उतरून काम करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, त्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्याचे संरक्षण होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छता व्यवस्थेला अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
याबाबत बोलताना सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत प्राप्त झालेले हायड्रो जेटिंग मशीन सातारा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याबरोबरच सफाई कर्मचार्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सातारा घडविण्यासाठी सातारा नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील.
सातारा नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना गुणवत्तापूर्ण नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, स्वच्छ सातारा - सुंदर सातारा - निरोगी सातारा हे ध्येय साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
याप्रसंगी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ऍड. डी. जी. बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, बांधकाम सभापती विनोद खंदारे, नगरसेवक फिरोज पठाण, रविंद्र ढोणे, रविराज किर्दत, सुधाकर यादव, आरोग्य विभाग प्रमुख राकेश गलियन, नितीन माळवे, सुजित जाधव उपस्थित होते.