सातारा : महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह देशमुख यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की राज्यात तसेच जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान 50 हजार रुपये तातडीने मदत द्यावी. राज्यात विविध ठिकाणी विशेषत: मराठवाड्यात मोठ्या पावसामुळे गाई ,म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी दुभती जनावरे वाहून गेली आहेत. त्यांचे पंचनामे करून त्यानुसार शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी .महायुती सरकारने सत्तेत येताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा काळात बँकांचे कर्ज वसुलीसाठी तगादे सुरू आहेत. शासनाने हीच वेळ योग्य समजून संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी. कधी नव्हे ते राज्यातील शेतकऱ्यांचे पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती ओळखून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानीचे निकष बदलून माणुसकीचे दर्शन घडवावे ,अशी अपेक्षाही या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
दरम्यान काँग्रेसच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख,राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, प्रताप देशमुख, रजनी पवार निवास थोरात, अजित कदम, डॉ. संतोष कदम, संदीप माने, अमोल शिंदे, अभय कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.