चुकीची कागदपत्रे सादर करणार्‍यांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 04 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीचे कागदपत्र सादर केले असून अशा 5 शिक्षकांचे प्रस्ताव प्रशासकीय कारवाईसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची ऑनलाईन कार्यवाही सुरू आहे. बदलीसाठी संवर्ग 1, 2 व 3 मधील शिक्षकांनी विविध कागदपत्रे सादर केली होती. त्यानुसार संवर्ग 1 मधील 19, संवर्ग 2 मधील 10, संवर्ग 2 मधील 1 व बदलीपात्र 4 शिक्षकांना सातारा जिल्हा परिषदेमध्ये सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. शिक्षकांनी जी कागदपत्रे सादर केली आहेत त्या कागदपत्रानुसार समितीने संबंधित शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी केली. त्यामध्ये 5 शिक्षकांनी खोटी व चुकीची माहिती भरली असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे या शिक्षकांवर खोटी व चुकीची माहिती दिल्याप्रकरणी प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, संवर्ग 1 मधील 581 शिक्षकांनी बदलीसाठी विविध आजाराची कागदपत्रे जोडली होती. या शिक्षकांच्या आजारांशी निगडीत तपासणी जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 10 शिक्षकांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेमध्ये गुरूवारी बैठक झाली बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपशिक्षणाधिकारी हेमंत खाडे, शिक्षण विस्तार अधिकारी सन्मती देशमाने उपस्थित होते.

जिल्हा रूग्णालयात 581 शिक्षकांपैकी 61 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा मान्य अमान्य अहवाल त्वरित प्राथमिक शिक्षण विभागास सादर करण्याच्या सूचना याशनी नागराजन यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. सोमवारपासून 25 शिक्षकांची तपासणी करावी. यामध्ये शिक्षक अपात्र आढळल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा
पुढील बातमी
‘गुरुकुलची दिंडी’ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दिशादर्शक : जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या