सातारा : पुण्याहून सातार्याकडे बसने येणार्या व्यावसायिकाच्या बॅगेची खालची बाजू कापून अज्ञात चोरट्यांनी 17 लाख 10 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. मोळाचा ओढा येथे बसमधून उतरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कालुसिंह जीवसिंह देवल यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा येथे सदाशिव पेठेतील देवल हे मंगळवारी (दि. 13) दागिन्यांच्या खरेदीसाठी पुण्याला गेले होते. तेथील एका सराफी पेढीतून त्यांनी 16 लाख 99 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या 11 साखळ्या आणि 11 हजार 500 रुपये किमतीचा चांदीचा करगोटा खरेदी केला. खरेदी केलेला ऐवज बॅगेत ठेवून ते रिक्षाने स्वारगेट बसस्थानकावर आले. त्यानंतर बसने सातार्याकडे प्रवास सुरू केला.
सायंकाळी सातच्या सुमारास बस मोळाचा ओढा येथे आल्यानंतर ते खाली उतरले. यावेळी बॅग तपासली असता, तिची खालची बाजू दोन ठिकाणी कापल्याचे दिसून आले. बॅगेतील दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी चोरी झाल्याची खात्री केली.
बसप्रवासातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही चोरी केल्याचा संशय आहे. देवल यांच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोवेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
बसप्रवासात व्यापार्याकडील दागिन्यांची चोरी; तब्बल 17 लाखांचे दागिने चोरीस
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा