सातारा : साताऱ्यातील हॉटेल फर्न सध्या राजकीय बैठकांचे मध्यवर्ती केंद्र बनले आहे. मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या आमदार व खासदार यांनी सुमारे दीड तास राजकीय खलबते करत शेवटपर्यंत एबी फॉर्म कोणाला हा सस्पेन्स कायम ठेवला. एबी फॉर्मचे वाटप बुधवारी सकाळी संबंधित उमेदवारांना दिला जाणार असल्याने नक्की कोणत्या गटा गणामध्ये काय फॉर्मुला ठरला हे मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिले.
नगरपालिका निवडणुकांच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकदाच हजर झालेले खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेच्या निमित्ताने झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पुन्हा हजर झाले. बैठकीत शिंदे गटाचेआमदार महेश शिंदे यांनी सुद्धा हजेरी लावली होती. या बैठकीला कराड दक्षिणचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे,माजी आमदार मदन दादा भोसले,निवडणूक प्रभारी धैर्यशील दादा कदम,इत्यादी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
सातारा कराड या दोन तालुक्यातील एकूण वीस गटाच्या संदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे मात्र याबाबतची राजकीय वाटणी त्या विधानसभा मतदारसंघातील आमदाराच्या विचारानुसार होणार असण्याचा फॉर्म्युला ठरला होता त्याबाबत काय निर्णय झाला आणि एबी फॉर्म कोणाला देण्यात येणार याबाबतची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे .सातारा तालुक्यातील गट आणि गट या संदर्भातही शिवेंद्रसिंह राजे आणि खासदार उदयनराजे यांच्या चर्चा झाली मात्र त्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात ठेवत दोन्हीही नेत्यांनी प्रसार माध्यमांची काहीही न बोलता तेथून निघून जाणे पसंत केले .जिल्ह्यातील सर्व गटा व गणांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार तसेच अमुक एक गट तमुक एक गट असे काहीही नाही सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहे असे स्पष्टीकरण शिवेंद्रसिंहराजे यांनी देत पत्रकारांना सुद्धा चर्चेचा थांग लागू दिला नाही. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पाठखळ आणि कोडोली तसेच कराड उत्तर मधील नागठाणे आणि वरणे या चार गटांवर सुद्धा राजकीय मतैक्य होणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात आमदार महेश शिंदे यांनी काय भूमिका मांडली त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्या का याबाबतही कोणताही तपशील बाहेर पडला नाही.
भारतीय जनता पार्टीने कोणताही होणारा दगा फटका टाळण्यासाठी एबी फॉर्मचा सस्पेन्स शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवला आहे. दिनांक 21 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे .त्यामुळे दुपारी 12 ते 3 हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे .निवडणूक निरीक्षकांच्या माध्यमातून एबी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे. या बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म आणल्याची चर्चा आहे मात्र त्यांनी या संदर्भात अधिक बोलण्यास नकार दिला