पुणे : शाळेत मिळणारा पोषण आहार विद्यार्थ्यांसाठी केवळ दुपारचे जेवण नाही, तर अनेक मुलांसाठी दिवसातील महत्त्वाचा पौष्टिक आहार असतो. त्यामुळे त्यांच्या ताटात वाढला जाणारा प्रत्येक घास स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक असावा, यासाठी शिक्षण विभागाने आता शाळांवर अधिक जबाबदारी टाकली आहे. पीएम-पोषण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांसाठी ११-कलमी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना आहार देण्यापूर्वी धान्याचा दर्जा, स्वयंपाकाची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता आणि तयार अन्नाची चव याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण संचालक, प्राथमिक शरद गोसावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारेही माहिती दिली.
राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पीएम-पोषण योजनेतून आहार दिला जातो. प्राथमिक विद्यार्थ्यांच्या आहारातून ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी दररोज १०० ग्रॅम, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविला जातो. पुरवठादाराकडून आलेला तांदूळ आणि इतर धान्य योग्य दर्जाचे व योग्य वजनाचे आहे का, याची खात्री करूनच तो स्वीकारावा. स्वयंपाकाची जागा, भांडी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि परिसर स्वच्छ ठेवावा. स्वयंपाकी व मदतनीसांनी ॲप्रन आणि टोपी वापरावी, तसेच स्वयंपाकापूर्वी हात स्वच्छ धुणे बंधनकारक आहे.
मैदानावर नाही, स्वच्छ जागेत जेवण
विद्यार्थ्यांनी मातीवर किंवा मैदानात बसून जेवू नये, यासाठी शाळांनी स्वच्छ बैठक व्यवस्था करावी. शाळेच्या आवारापासून ५० मीटर परिसरात जास्त फॅट, साखर व मीठ असलेले पदार्थ, तसेच प्रतिबंधित जंक फूड विकण्यास बंदी आहे. याबाबत दर्शनी भागात फलक लावण्याचेही निर्देश आहेत.
मुलांच्या ताटाची चव आधी तपासणार
विद्यार्थ्यांना आहार देण्यापूर्वी माता-पालकांकडून त्याची चव तपासली जाणार आहे. त्यांचा अभिप्राय चव नोंद रजिस्टरमध्ये नोंदवावा लागणार आहे. मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीनेही दररोज आहाराची चव घेऊन गुणवत्ता तपासावी.
अचानक तपासणी; नोंदीही तपासणार
जिल्हा आणि तालुकास्तरीय भरारी पथके शाळांना अचानक भेट देऊन आहाराची गुणवत्ता व स्वच्छता तपासणार आहेत. आहार घेतलेल्या विद्यार्थ्यांची दैनंदिन नोंद एमडीएम पोर्टल आणि नोंदवहीत करावी लागणार आहे. तांदूळ-धान्याचा वापर, शिल्लक साठा आणि खर्चाचा हिशेब अद्ययावत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा नको; शिक्षण विभागाचे शाळांना ११ कलमी सूचना, शिक्षण संचालक शरद गोसावी यांची माहिती
by Team Satara Today | published on : 02 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा