मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातास कारणीभूत ठरलेल्या व्हीएसआर (VSR) कंपनीच्या मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात तथ्य नसल्यास राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, असे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
अजित पवार यांच्या विमान अपघातामागे असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाला राज्यातील एक बडा नेता पाठीशी घालत असल्याचा दावा रोहित पवार यांनी यापूर्वी केला होता. त्या नेत्याचे नाव जाहीर करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. जयपूर येथे व्ही. के. सिंह यांच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते आणि ते व्ही. के. सिंह यांचे निकटवर्तीय आहेत, असा दावा पवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांकडे राज्याची सत्ता आणि सीआयडी यंत्रणा आहे, तसेच केंद्रातील सीबीआय आणि पंतप्रधानही त्यांचे ऐकतात; तरीही या प्रकरणाचा तपास का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात सध्याचे सरकार कंपनीला वाचवत असले, तरी भविष्यात आमचे सरकार आल्यास संबंधित कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणातील तपासाच्या दिरंगाईवर भाष्य करताना रोहित पवार यांनी भावनिक आणि आक्रमक भूमिका मांडली. आपण आपल्या काकाला न्याय देऊ शकलो नाही, तर सर्वसामान्य गरीब जनतेला काय न्याय देणार, असा प्रश्न सातत्याने मनात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील सत्य समोर आणताना स्वतःचे राजकारण धोक्यात आले तरी चालेल, पण आपण मागे हटणार नाही, असे ते म्हणाले. संबंधित नेत्याने अजित पवार यांचा घातपात केला असे आपण म्हणत नसून, अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचा संशय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) अनेक पुरावे सादर करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. अजित पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी असूनही आणि त्यांच्याच आमदारांनी सीबीआय चौकशीची मागणी करूनही ती मान्य होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
व्हीएसआर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी अनेक धक्कादायक दावे केले. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंह याने अमेरिकेत १८ कोटी रुपयांचे घर खरेदी केले असून, ज्याच्याकडून हे घर घेतले तो व्यक्ती ड्रग्ज तस्करीत गुंतलेला आहे, असा आरोप त्यांनी केला. रोहित सिंह याचा व्यावसायिक भागीदारही एकावेळी दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचा दावा करत कंपनीचे सर्वच व्यवहार संशयास्पद असल्याचे पवार म्हणाले. याशिवाय, व्ही. के. सिंह यांच्या २७ कंपन्या असून कोलकात्यातील एका कंपनीच्या माध्यमातून तब्बल ८६८ कोटी रुपये कायदेशीर (व्हाईट) केले गेले, तरीही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यावर कोणतीही चौकशी का केली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. अपघातानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी नसतानाही व्हीएसआर कंपनीला १६८ कोटी रुपये दिल्याचा आरोप करत यामागील शक्तीचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली.
अजित पवार यांच्या प्रवासातील बदलांबाबत माहिती देताना रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार हे रस्तेमार्गे मोटारीने बारामतीला जाणार होते. मात्र, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा फोन आल्यानंतर आणि एका व्यक्तीने फाईलवर सही घेण्यासाठी थांबवून ठेवल्यामुळे त्यांचा दौरा लांबला व त्यांना नाईलाजास्तव विमानाने प्रवास करावा लागला. अपघातानंतर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता, सुरुवातीला तयार असलेल्या पोलिसांनी कोणाचातरी फोन आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप त्यांनी केला. अखेर कर्नाटकात जाऊन 'झिरो एफआयआर' दाखल करावा लागला आणि तो गुन्हा महाराष्ट्रात वर्ग झाल्यानंतरही सीआयडीने स्वतंत्र गुन्हा न नोंदवता केवळ जोडपत्र म्हणून स्वीकारल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या अपघाताच्या आदल्या दिवशी आणि त्यानंतरच्या तीन दिवसांत समता पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिल्याचा उल्लेख रोहित पवार यांनी केला. तसेच, अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर काळी जादू करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यात कोकणातील एका नेत्याचा सहभाग असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. आपल्याकडे पोलीस किंवा सीबीआय नसली, तरी प्रामाणिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आतापर्यंत पाच सादरीकरणे (प्रेझेंटेशन) केली असून सत्य बाहेर येईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या ताफ्यातील विमाने आणि त्यांच्याशी संबंधित उद्योग समूहांची माहितीही मांडली. यामध्ये अपघातग्रस्त ४० कोटी रुपये किमतीच्या 'व्हीटी-एसएसके लिअरजेट ४५एक्सआर' (VT-SSK Learjet 45XR) या विमानासह जयेश शाह (नमन ग्रुप) यांच्याशी संबंधित १२५ कोटींचे 'व्हीटी-सीएमआर लिगसी ६००', मध्य प्रदेशातील संजय पाठक यांच्याशी संबंधित ६० कोटींचे 'व्हीटी-सीआरए लिअरजेट ४५एक्सआर', संजय गुप्ता यांच्याशी संबंधित १२५ कोटींचे 'व्हीटी-एनएसजी लिगसी ६००', हॅवेल्स ग्रुपशी संबंधित ६० कोटींचे 'व्हीटी-व्हीआरव्ही लिअरजेट ४५एक्सआर', दिलीप बिल्डकॉनशी संबंधित ६० कोटींचे 'व्हीटी-डीबीएल लिअरजेट ४५एक्स' आणि कुलदीप सोळंकी यांच्याशी संबंधित १४० कोटींचे 'व्हीटी-टीएटी फाल्कन २०००' या विमानांचा उल्लेख करण्यात आला. त्याचप्रमाणे विश्वसमुद्र ग्रुपशी संबंधित 'व्हीटी-व्हीएसजी', वेलस्पन ग्रुपशी संबंधित 'व्हीटी-डीबीजी', हेरिटेज ग्रुपकडून वापरले जाणारे ४० कोटींचे 'व्हीटी-एमईजी पिलाटस' आणि शशिधर चितळे व त्रिवेणी समूहाशी संबंधित ४० कोटींचे 'व्हीटी-टीआरआय लिअरजेट ४५' या विमानांची नावे त्यांनी समोर आणली. या यादीतील १५० कोटी रुपये किमतीचे 'व्हीटी-व्हीएसव्ही लिगसी ६५०' (VT-VSV Legacy 650) हे विमान नेमके कोणाच्या मालकीचे आहे, याचा खुलासा महाराष्ट्रातील त्या संबंधित नेत्याने करावा, असे आव्हानही रोहित पवार यांनी दिले आहे.
अजितदादांच्या अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा; 'व्हीएसआर' कंपनीला वाचवत असल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा