शिरवळ : शिरवळ येथे वराहासाठी खाद्य गोळा करणार्या युवकाचे अपहरण झाले होते. या प्रकरणाचा अवघ्या 7 तासात छडा लावत शिरवळ पोलिसांनी 5 जणांना अटक केली. अपहरण झालेल्या व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी दुचाकी चोरल्याच्या संशयातून हे अपहरण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
नंदकुमार चंद्रकांत शिंगटे (वय 42), प्रतीक चंद्रकांत शिंगटे (वय 26, दोघे रा. खडकी, ता. वाई), गणेश शिवाजी पाचंगणे (वय 27, रा. सारोळा, ता. जामखेड), युवराज जालिंदर गायकवाड (वय 52, रा.राजुरी, ता. जामखेड), रमेश परसराम बहिर (वय 36 रा. नाव्हली, ता.जामखेड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवार दि.20 रोजी भरत लक्ष्मण वाघमारे (वय 36, रा. पळशी, ता. खंडाळा) या युवकाचे अपहरण करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. संशयितांपैकी एकाचा भाऊ हा नारायणगाव, जुन्नर येथे असल्याची माहिती पोनि यशवंत नलावडे यांना मिळाली. त्यानुसार संशयिताच्या भावाला ताब्यात घेतले असता अपहरणात वापरलेल्या वाहनाचा चालक मुळशीमध्ये एका डोंगराळ भागात असल्याचे समजले. यावर त्या ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता अपहरण झालेले भरत वाघमारे हे अपहरणात वापरलेल्या वाहनासह पोलिसांना सापडले.
चार वर्षांपूर्वी भरत वाघमारे याने नंदकुमार शिंगटे यांची दुचाकी चोरी केल्याच्या संशयावरून ते पैसे वसूल करण्यासाठी भरत वाघमारे यांचे अपहरण केल्याचे संशयितांनी सांगितले. या कारवाईत पोनि नलवडे यांच्यासह सपोनि सुशील भोसले, कीर्ती म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट, पोलीस अंमलदार सचिन वीर, नितीन नलवडे, प्रशांत धुमाळ, मनीषा बोडके, अरविंद बार्हाळे, भाऊसाहेब दिघे, मंगेश मोझर, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, दीपक पालेपवाड, अक्षय नेवसे, सोनाली जाधव यांनी केली.