दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांना उद्यापासून प्रारंभ; कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथके तैनात

by Team Satara Today | published on : 15 June 2026


सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांना मंगळवार (दि. 16) पासून प्रारंभ होत असून, या परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये परीक्षा अत्यंत कडक शिस्तीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची निगराणी असणार असल्याची माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी दिली.

दहावीची लेखी परीक्षा 16 ते 30 जून या कालावधीत होणार असून बारावीची पुरवणी परीक्षा 16 जून ते 8 जुलैदरम्यान पार पडणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात एकूण 59 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी दहावीसाठी 34 तर बारावीसाठी 25 केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

10 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुरवणी परीक्षेसाठी एकूण 11 हजार 279 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सातारा जिल्ह्यात दहावीचे 912 व बारावीचे 2 हजार 116 असे एकूण 3 हजार 28 परीक्षार्थी 15 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. सांगली जिल्ह्यात 4 हजार 326 विद्यार्थी 20 केंद्रांवर, तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 हजार 925 विद्यार्थी 24 केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

परीक्षेतील पावित्र्य अबाधित राखण्यासाठी मंडळाने ’कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, त्याचे चित्रीकरण सुरक्षित ठेवण्याच्या सक्त सूचना शाळा प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समिती कार्यरत असून त्यामध्ये पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.

संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष

विभागीय मंडळ आणि जिल्हा प्रशासनाने संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांची यादी निश्चित केली असून अशा केंद्रांवर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार आढळल्यास केंद्रचालक व संबंधित कर्मचार्‍यांवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

गैरप्रकारमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी सातार्‍यात 17 जूनला संघर्ष मोर्चा; मातंग समाजासह 58 वंचित जातींना समान संधीची मागणी
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

संबंधित बातम्या