पावसाळी पर्यटन स्थळांवर हवा पोलिसांचा 'वॉच'

हौशी पर्यटकांच्या मर्कटलीलांमुळे पर्यटक हैराण ; बामणोलीत पोलीस ठाण्याची गरज

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा : नैसर्गिक साधन संपत्तीने सातारा जिल्ह्यावर मुक्तहस्ते उधळण केली असून राज्यभरातून सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. विशेष करून महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, बामणोली, कास पठार, ठोसेघर, चाळकेवाडी पठार आणि सडावाघापूर ही ठिकाणे पावसाळी पर्यटनाची पंढरी ठरली असताना मात्र महाबळेश्वर आणि पाचगणी वगळता एकाही पावसाळी पर्यटन स्थळांवर पोलीस ठाणे कार्यरत नसल्यामुळे हौशी पर्यटकांच्या मर्कटलीलांमुळे पर्यटक हैराण होत आहेत. नावाच्या भीतीमुळे अनेकजण याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करत नसल्यामुळे अनेक पावसाळी पर्यटन स्थळांवर वादावादीचे प्रकार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, बामणोली या पर्यटन स्थळाच्या आसपास अनेक गावे, वाड्यावस्त्या असून त्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, बामणोली, कास पठार, ठोसेघर, चाळकेवाडी पठार आणि सडा- वाघापूर ही ठिकाणे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी केवळ महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पोलीस ठाणे कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कास पठार, ठोसेघर, चाळकेवाडी पठार, सडावाघापूर ही पावसाळी पर्यटन स्थळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबई तर परराज्यातील गुजरात, कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक पठारावर फुललेली दुर्मिळ फुले, कोसळते धबधबे, उलटा धबधबा, धुक्याने अच्छादलेले पठार पाहण्यासाठी गर्दी करत असतात. पर्यटकांमध्ये हौसे, गवसे आणि नवसे यांचा समावेश असल्यामुळे काही पर्यटकांमधून पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी गदारोळ, गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतो. पर्यटन स्थळावर नव्हे तर आसपास कोठेही पोलीस ठाणे नसल्यामुळे अशा अपप्रवृत्ती फोफावत आहेत.

जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा कालावधी समाजाला जातो. मात्र यावर्षी मे महिन्यांपासून सुरू झालेला पावसाळा आता ऑक्टोबर एंड आला असतानाही सुरू असल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा चांगलाच आनंद लुटला. ऐन पावसाळ्यात कास, बामणोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहने यवतेश्वर येथे पोलिसांकडून तपासली जातात. ही कृती योग्यच आहे मात्र हीच तपासणी कास पठारावर असणाऱ्या पठार प्रवेशद्वारावर करून उरलेल्या वेळेत पोलिसांनी कास पठारावर फेरफटका मारला असता अपप्रवृत्तींवर एक चांगला वचक बसण्यास मदत झाली असती. ठोसेघर, चाळकेवाडी पठार, सडावाघापूर या ठिकाणी भेटी देण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची वाहने गजवडी फाट्याच्या पुढे म्हणजेच ठोसेघर मार्गावर असणाऱ्या एका महाविद्यालयाच्या परिसरात केली जाते. त्यापेक्षा हिच वाहन तपासणी सत्याई फाटा येथे केली तर उरलेल्या वेळात पोलिसांना ठोसेघर धबधबा परिसर आणि चाळकेवाडी पठार परिसरात फेरफटका मारता आला असता त्यामुळे पर्यटन स्थळांवर विनाकारण गोंधळ आणि गदारोळ करणाऱ्या अपप्रवृत्तींना चाप बसला असता.

पर्यटकांची बामणोलीला अधिक पसंती

महाबळेश्वर मार्गे तापोळ्याला जाण्यासाठी अधिक वेळ व पैसा खर्च करायला लागतो. बामणोलीमार्गे गेल्यास वेळ आणि पैशाची बचत होते. त्यामुळे पर्यटक या मार्गालाच अधिक पसंती देतात. बामणोली येथून वासोटा किल्ला, नागेश्वरी, चकदेव ही पर्यटन स्थळे जवळ आहेत. तसेच बामणोलीनजिक मुनावळे हे ठिकाण विकसित करण्यात येत असल्यामुळे पर्यटक बामणोलीला अधिक पसंती देत असल्याचे पहायला मिळत आहे. या ठिकाणी असणाऱ्या शिवसागर जलाशय अनेकांना खुणावत असतो. बामणोली परिसरात अनेक गावे आणि वाड्यावस्त्या आहेत. बामणोली हे ठिकाण दुर्गम समजले जाते मात्र या ठिकाणी दुर्दैवाने पोलीस ठाणे कार्यरत नाही. त्यामुळे बामणोली व परिसरात काही दुर्घटना झाल्यास संबंधितांना थेट मेढा पोलीस ठाणे गाठावे लागते. त्यामुळे बामणोलीची वाढती व्याप्ती पाहता बामणोली या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत करावे, अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगर, गोळीबार, गोडोली परिसरातील पाणीप्रश्न तातडीने सोडवा
पुढील बातमी
25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिक्षण विभागाची महिला कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

संबंधित बातम्या