सातारा : सातारा तालुक्यातील गणेशवाडी येथे झालेल्या खुनाच्या प्रयत्न प्रकरणात आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची आणि १ लाख १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग–२), एस. आर. तांबोळी सातारा यांनी मारुती तात्याबा साळुंखे (वय ७०, रा. गणेशवाडी, ता. सातारा) यास ठोठावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मारुती साळुंखे याने दि. २५ जुलै २०१८ रोजी फिर्यादीचे वडील संतोष राजाराम जाधव (वय ४५) यांच्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने मान व डोक्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. मारुतीचा गैरसमज झाला होता. या प्रकरणाची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात येथे दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
प्रकरणाचा पाठपुरावा सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी केला. खटल्यादरम्यान एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकारी पक्षाच्या युक्तीवादावरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने मारुतीला १० वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख १० हजार दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, दंडातील १ लाख रक्कम ही फिर्यादीस देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर (बोरगाव पोलीस स्टेशन प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पो. अं. ब. नं. ३०६ प्रमोद फंरादे आणि पो. अं. व. नं. ११५५ विश्वनाथ आंद्राळे यांनी कामकाज पाहिले.
तसेच, या कार्यात पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे श्रेणी पो. उपनिरीक्षक संजय पाटील, श्रेणी पो. अरविंद बांदल, श्रेणी पो. शशीकांत गोळे, सफो. गजानन फंरादे, पो. ह.वा. परशुराम वाघमारे, म.पो.ह.वा. रहिनाबी शेख आणि पो. अं. गजानन फडतरे यांनी महत्त्वाची मदत केली.