सातारा : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) कॅडेट्सनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा गौरवशाली इतिहास विशद करून कामगार दिनाचे औचित्य स्पष्ट केले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या कष्टाचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर ग्रंथपाल प्रा. पुरुषोत्तम वाकडे यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा आढावा घेतानाच ज्ञान आणि परिश्रमाच्या जोरावर समाज अधिक सक्षम होतो, असे विचार मांडले.
श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व स्पष्ट करताना प्रा. डॉ. राजेंद्र सातपुते यांनी प्रत्येक व्यक्तीच्या श्रमाचा आदर करणे हीच खऱ्या प्रगतीची दिशा असल्याचे सांगितले. तसेच तरुणांनी भविष्यात कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये, समता आणि बंधुता या तत्त्वांचा अंगीकार करून देशाचे जबाबदार नागरिक बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना पवार यांनी केले, तर प्रा. स्वाती बोटे-जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.