साताऱ्यात ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप?” शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष, मेळाव्यात आ. महेश शिंदे उपस्थित राहणार का ?

by Team Satara Today | published on : 19 April 2026


सातारा : सातारा शहरातील गांधी मैदानावर सोमवारी होणारा शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा केवळ शक्तिप्रदर्शनापुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांना थेट धक्का देणारा ठरण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच साताऱ्यात जाहीर सभा घेत असल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या मेळाव्यामागे दोन स्पष्ट उद्दिष्टे दिसून येत आहेत. साताऱ्यात शिवसेनेला नव्याने ताकद देणे आणि नाराज-निष्ठावंत शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय करून संघटनात्मक बांधणीला गती देणे. जिल्हा परिषद सत्तेच्या समीकरणात संख्याबळाचे गणित चुकल्याने शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेबाहेर राहिली. हा राजकीय धक्का अजूनही ताजा असतानाच शिंदे गटाने संघटना मजबूत करण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

साताऱ्यात सध्या शिवसेनेचे दोन आमदार. पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि कोरेगावचे महेश शिंदे हेच पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. मात्र, जिल्हा परिषद सत्तानाट्यात आमदार महेश शिंदे यांनी भाजपच्या गोटातून पत्नीला अध्यक्षपद मिळवून दिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत पक्षातच कुजबुज सुरू झाली आहे. ‘तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत, पण मनाने भाजपमध्ये’ अशी चर्चा उघडपणे रंगू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर या मेळाव्यात आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार का, हा खरा कळीचा मुद्दा ठरला आहे. पाटण येथील कोयना डोंगरी महोत्सवात उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित असतानाही महेश शिंदे अनुपस्थित राहिल्याने राजकीय संकेत स्पष्ट झाले होते. त्यामुळे गांधी मैदानावरील मंचावर त्यांची उपस्थिती की अनुपस्थिती—दोन्ही परिस्थितींना वेगळे राजकीय अर्थ निघणार आहेत.

दरम्यान, या मेळाव्यातून शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व अधोरेखित करत भाजपसमोर ‘डोळ्याला डोळा’ देण्याची भूमिका घेण्याचे संकेत दिले जात आहेत. शिवसैनिकांना ‘चार्ज’ करून आगामी निवडणुकांसाठी सज्ज करण्याचा स्पष्ट प्रयत्न या शक्तिप्रदर्शनातून दिसत आहे.

गांधी मैदान हे परंपरेने भाजपच्या प्रभावाखालील क्षेत्र मानले जाते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रभाव असलेल्या या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचा मेळावा होणे, हीच एक मोठी राजकीय चाल मानली जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख ‘बोलतात कमी, करतात जास्त’ अशी आहे. त्यामुळे ते या सभेत केवळ संघटनात्मक घोषणा करतील की महायुतीतील ताणतणावावर थेट भाष्य करत नवा राजकीय संदेश देतील, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकंदरीत, हा मेळावा केवळ सभा नसून साताऱ्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची ‘ट्रेलर’ ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा साम्राज्य विस्तार नकाशा वगळल्याने साताऱ्यात शुक्रवारी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन - छत्रपती वृषालीराजे, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
पुढील बातमी
शैक्षणिक साहित्य वाटप करून महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी; महात्मा फुले युवा दलाचा लमाणवाडी शाळेत उपक्रम

संबंधित बातम्या