सातारा जिल्ह्यातील ५९ गावे आणि ३२२ वाड्यांची तहान ५२ टँकरवर; माण तालुक्यात सर्वाधिक झळ

by Team Satara Today | published on : 12 November 2026


सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, ५९ गावे व ३२२ वाड्यांमधील तब्बल ७९ हजार ६४५ नागरिक आणि ६४ हजार ९४७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
​जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण ५२ टँकरमध्ये १ शासकीय आणि ५१ खासगी टँकरचा समावेश आहे. या सर्व टँकरसाठी दररोज १०९.७२ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. पाण्याची ही गरज पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ११ विहिरी आणि १० बोअरवेलचे अधिग्रहण केले असून, त्या माध्यमातून टँकर भरून संबंधित गावांमध्ये पाणी पोहोचवले जात आहे. टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये माण तालुक्याची स्थिती सर्वाधिक गंभीर असून, येथील ४५ गावे आणि २६९ वाड्यांमधील ६४ हजार ४५४ लोकसंख्या व ५८ हजार पशुधनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील ११ गावे आणि ५१ वाड्यांमधील १३ हजार ४१७ नागरिक व ६ हजार ६६७ पशुधनासाठी ७ खासगी टँकर कार्यरत आहेत. तसेच फलटण तालुक्यातील ३ गावे आणि २ वाड्यांमधील १ हजार ७७४ लोकसंख्या व २८० पशुधनाची तहान भागवण्यासाठी १ खासगी टँकर सुरू ठेवण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील बाल निरीक्षणगृहातून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; २ डिसेंबरपर्यंत मुदत

संबंधित बातम्या